Ahmednagar News : एका स्कूल बसची समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक बसून झालेल्या अपघातात चुलत्या, पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील येळी शिवारात घडली. प्रकाश पंढरीनाथ ढाकणे (वय ३४) व मधुकर सुधाकर ढाकणे (वय २६, दोघेही रा. काटेवाडी ता. पाथर्डी) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
शनिवारी सायंकाळी पाथर्डी शहरासह तालुक्याच्या पाथर्डीच्या काही भागात जोरदार वादळवारा सुटला होता. या वादळात अनेक झाडे उन्मळून पडली होती. येळी शिवारात असलेल्या एका पेट्रोलपंपाजवळील रस्त्यावर एक झाड पडले होते.
या झाडापासून एका स्कूल बस जात असताना या बसची दुचाकीला जोराची धडक बसली. त्यामध्ये दुचाकीवर असलेले प्रकाश ढाकणे व मधुकर ढाकणे हे चुलते-पुतणे जखमी झाले. दोन्हीही जखमींना रुग्णालयात आणले. मात्र, दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मयत प्रकाश ढाकणे हा रायगड जिल्ह्यात एसटी चालक म्हणून काम करीत होता. अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांची आकडेवारी चिंताजनक आहे. वेगावरील अनियंत्रण, रस्त्यांची दुर्दशा, बेजबाबदारपणे वाहने चालवणे आदींमुळे अपघातांची संख्या वाढलेली आहे. अपघातांकमधील मृतांची संख्या देखील काळजीत टाकणारी आहे.
त्याच दिवशी राहुरीमध्येही अपघाताची घटना घडली. राहुरी शहरात नगर-मनमाड रस्त्यावर वडील व मुलगा मोटारसायकलवर कोल्हारकडून नगरकडे जात असताना मागून आलेल्या कंटेनरची त्यांना जोराची धडक बसली. या घटनेत विजय शिरसाठ यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या मुलगा किरकोळ जखमी झाला.
याबाबत माहिती अशी, की विजय द्वारकानाथ शिरसाठ (वय ३० वर्षे) व ओम विजय शिरसाठ (वय १२ वर्षे, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी) हे दोघे त्यांच्या मोटारसायकलवर कोल्हार खुर्द येथून नगर येथे एका लग्न समारंभासाठी जात होते. ते दोघे नगर-मनमाड रस्त्याने जात असताना जोगेश्वरी आखाडा परिसरात त्यांच्या मोटारसायकलला एका कंटेनरची जोरात धडक बसली.