अहमदनगर बातम्या

शाळकरी मुलं तलावात पोहायला गेली, हाच निर्णय काळ बनला.. अहमदनगरवर शोककळा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मित्रांच्या सोबत निंबळक शिवारात असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.३१) सायंकाळी घडली आहे. महंमद जैद मुनीर शेख (वय १२, मूळ रा. वडाळा बहिरोबा, ता. नेवासा, हल्ली रा. बोल्हेगाव, अहमदनगर) असे मयत मुलाचे नाव आहे.

मयत महंमद आणि त्याचे शाळेतील तीन मित्र असे चौघे जण बुधवारी (दि. ३१) सायंकाळी निंबळक शिवारात असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यातील महंमद आणि आणखी एकाला पोहता येत नव्हते. ते दोघे कडेला पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करत होते.

हळूहळू ते थोडे पुढे गेले आणि पाण्यात बुडू लागले. त्यांच्या मित्रांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केल्यावर परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीला धावले. त्यातील एकाला पाण्यातून वर काढण्यात नागरिकांना यश आले. मात्र महंमद हा पाण्यात बुडाला. काही वेळाने त्यालाही नागरिकांनी पाण्यातून बाहेर काढले. मात्र तो बेशुद्ध झाला होता.

त्यास तेथील नागरिक तसेच त्याचे वडील मुनीर याकुब शेख आदींनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात सायंकाळी ७ च्या सुमारास आणले. मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. खेडकर यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबतची माहिती दवाखाना ड्युटीवर असलेले तोफखाना पोलिस ठाण्यातील

स. फौ. जठार यांनी एमआयडीसी पोलिसांना कळविली. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा घटना सातत्याने घडलेल्या दिसून येतात. यामध्ये पालकांनी आपल्या मुलांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. तसेच मुलांनी देखील पाण्याच्या ठिकाणी जाताना पालकांना सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे.

Ahmednagarlive24 Office