Ahmednagar News : बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील तिसगाव वनपरिक्षेत्र विभागाअंतर्गत येणाऱ्या करंजी येथील डोंगराला आग लागून मोठ्या प्रमाणात वनसंपदेसह पशुपक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.
करंजी येथील जंगलाला दरवर्षीच आग लागून जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर्षी तर मार्च आणि एप्रिल दोन महिन्यात दोन वेळेस जंगलाला आग लागून शेकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले असून, यामध्ये जंगलातील झाडाझुडपांसह पशुपक्ष्यांची देखील अक्षरशा राख झाली आहे.
बुधवारी रात्री करंजीसह तिसगाव पर्यंतच्या दहा पंधरा किलोमीटरवरून करंजीच्या डोंगराला आग लागलेली आग अगदी ठळकपणे दिसून येत होती. एवढा मोठा वनवा या जंगलाला लागला होता. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आष्टी तालुक्याच्या जंगल हद्दीतून ही आग करंजी वनविभागाच्या हद्दीत सरकली,
त्यानंतर मात्र या आगीने मोठे रुद्ररूप धारण केले. बघता बघता ही आग करंजी येथील भटेवाडी, वाघदरा खंडोबावाडी, सातवड या संपूर्ण परिसरात पसरली. रात्री नऊ वाजेपर्यंत या आगीने संपूर्ण जंगलाचा परिसर वेढला.
तिसगाव वनपरिक्षेत्र विभाग अंतर्गत येणाऱ्या करंजी दगडवाडी कोल्हार घाटशिरस या परिसरातील जंगलाला आग लागून मागील दोन तीन वर्षांपासून या जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असतांना देखील वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करत या घटनांकडे आतापर्यंत दुर्लक्षच केले आहे.
आग लावली जाते का आपोआप लागते याबाबतची वस्तुस्थिती देखील समोर येणे महत्त्वाचे आहे. या दुर्दैवी घटनेबाबत वरिष्ठांनी देखील कोणावरही जबाबदारी निश्चित करून अद्याप कारवाई केलेली नाही. आणखी किती वेळा आग लागल्यानंतर वरिष्ठांचे डोळे उघडणार असा प्रश्न आता प्राणी मित्रांकडून उपस्थित केला जात आहे.
मागील तीन वर्षापासून करंजी तिसगाव वनपरिक्षेत्र विभाग अंतर्गत येणाऱ्या जंगलाला आग लागून मोठ्या प्रमाणात या जीवसृष्टीचे नुकसान झालेले आहे. दरवर्षी वृक्षारोपण केले जाते आणि दरवर्षीच आग लागून जंगलातील झाडाझुडपांची अक्षरशः राख रांगोळी होते मग शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च देखील या घटनांमुळे वाया जात आहे.
बुधवारी ११ च्या सुमारास लागलेली ही आग रात्रीच्या दहा वाजेपर्यंत सर्व दूर पसरलेली होती, त्यामुळे या आगीमध्ये नेमकी किती हेक्टर क्षेत्राची राख रांगोळी झाली हे समजू शकले नाही.