Ahmednagar News : उष्णता प्रचंड वाढली आहे. एप्रिल महिन्याचे शेवटचे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान आता पाणीटंचाईच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवू लागल्या आहेत.
त्यामुळे १८१ टँकरने जिल्ह्यातील १८६ गावे व ९५८ वाडीवस्तीवर पाणीपुरवठा सध्या होत आहे. परंतु उपलब्ध पाणीपुरवठा पाहता ही टंचाई अत्यंत भीषण होऊ शकते असा अंदाज आहे.
जिल्हा प्रशासनाने निविदा काढून वर्षभर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केलेली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टँकरची संख्या अवधी २४ होती. तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात टँकरची संख्या अवधी १०६ होती. त्यात आता वाढ होऊ लागलेली आहे.
आगामी काळात यात आणखी वाढ होणार आहे. यंदा पावसाने ताण दिल्याने जिल्ह्यात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईची स्थिती आहे. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आढावा बैठका झाल्या आहेत.
त्यात संभाव्य टंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार प्रशासनाने मागेल त्या गावात आता टँकर सुरू करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, अद्यापही तालुक्यासह जिल्हा स्तरावर टँकरचे प्रस्ताव पडून आहेत.
जिल्ह्यात टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या धामधुमीतच पाणीटंचाई वाढत असल्याने नेत्यांसह नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान जिल्ह्याचा विचार करता कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व राहुरी या चार तालुक्यांना टंचाईची झळ बसलेली नसल्याने या तालुक्यांत सध्या विहीर अधिग्रहण व टँकर सुरू झालेले नाहीत.
आकडेवारी
मंजूर टँकर : १८६
मंजूर खेपा : ५०१
टंचाईग्रस्त गावे : १८६
टंचाईग्रस्त वाड्या: ९५८
टँकरवर अवलंबून असलेली लोकसंख्या : ३ लाख ७० हजार १०९