Ahmednagar News : शेअर मार्केटच्या नावाखाली शेअर ट्रेडर्सने शेवगाव तालुक्यात धुमाकूळ घातल्यानंतर एकाएकाने पलायन केले. शेअर ट्रेडर्सकडे कामाला असलेल्या व्यक्तीने सोमवारी (ता. २७) घराजवळ लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याने शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली.
याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रामदास सुखदेव झिरपे, वय ३५ असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शेवगाव तालुक्यात मार्केटची सुरुवात झाल्यानंतर तालुक्यातील कोळगाव येथे विठ्ठल ताराचंद झिरपे या तरुणाने शेअर मार्केटची सुरुवात केली. रामदास झिरपे हे त्यांच्या चुलत भाऊ विठ्ठल याच्या मालकीच्या शेअर मार्केट कार्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत होता.
संबंधित शेअर मार्केट कंपनी चालवणारा युवक हा गत काही महिन्यापासून फरार झाला असल्याने गुंतवणूकदारांनी रामदास झिरपे यांच्याकडे पैशाचा तगादा लावला होता. संबंधित पसार झालेल्या त्यांच्या चुलत भावाचा ठावठिकाणा सांगावा, यासाठी विचारणा करीत होते. या सर्व गोष्टींना कंटाळून रामदास याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.
सोमवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी रामदास झिरपे यांचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर झिरपे हा उठला असता, घराच्या शेजारच्या लिंबाच्या झाडाला रामदास लटकलेल्या अवस्थेत दिसला.
संबंधित घटना पोलिसांना कळवण्यात आल्यावर पंचनामा करून शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यावर सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आहे.
शेवगावात कोट्यवधींचा गंडा
शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली गुंतवणूकदारांना चुना लावून अनेक एजंट कोट्यवधी रुपयांची लूट करून पसार झाले. त्यामुळे आर्थिक फसवणूक झालेल्या हजारो लोकांची चिंता वाढली आहे.