Ahmednagar News : न्यायालयीन कोठडीत असताना खुनातील महिला आरोपीची प्रसूती झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. अश्विनी बिरुटे असे या आरोपीचे नाव आहे. ही आरोपी महिला नेवासा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या व खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेली आरोपी आहे. अश्विनी बिरुटे हिची न्यायालयीन कोठडीत असतानाच ५ जूनला प्रसूती झाली. तिने मुलाला जन्म दिला आहे.
अधिक माहिती अशी : खडका फाटा येथे ३ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या रामेश्वर रामचंद्र कोरडे याच्या खुनाच्या गुन्ह्यात अश्विनी विशाल बिरुटे (रा. वरखेड, ता. नेवासा) हिला नेवासा पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस दुसऱ्याच दिवशी अटक केली होती.
अटकेच्या वेळी ती गरोदर होती. मागील ९ महिन्यांपासून ती न्यायालयीन कोठडीतच आहे. तिने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता परंतु गुन्हा गंभीर असल्याने न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता अशी माहिती समजली आहे.
खाकीतील माणुसकी
अटकेच्या वेळी अश्विनी गरोदर असल्याने मागील ९ महिन्यांच्या काळात तिची देखभाल नेवासा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी सुषमा जाधव, भारती पवार व वर्षा कांबळे यांनी केली. तिची वेळोवेळी ग्रामीण रुग्णालय तपासणी केली जात होती.
दरम्यान, दिवस भरल्यानंतर सोमवारी रात्री प्रसूतिवेदना सुरू झाल्याने तिला प्रथम नेवासा ग्रामीण रुग्णालयात व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी (दि. ५) प्रसूती होऊन तिने मुलाला जन्म दिला. सध्या तिच्या सुरक्षेसाठी महिला पोलिसांची नेमणूक केली असल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले.