अहमदनगर बातम्या

मेंढपाळांना धक्काबुक्की, मेंढ्यांना मारुन केले जखमी, अहमदनगरमधील संतापजनक प्रकार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मेंढ्या चारताना मेंढपाळांना धक्काबुक्की करत मेंढ्यांना मारुन जखमी केल्याचा संतापजनक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडला आहे. संगमनेर तालुक्यातील वरवंडी मध्ये हा प्रकार घडला.

येथील एका डोंगरावर मेंढ्या चारताना काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी केलेल्या या प्रकारामुळे नागरिकांत चीड निर्माण झाली आहे. दरम्यान या प्रकारादरम्यान काही सामाजिक कार्यकर्ते मेंढपाळांच्या मदतीला धावले. पोलिसांच्या मध्यस्तीने त्यांनी मेंढपाळांना न्याय मिळवून दिला.

राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी येथील मेंढपाळ कृष्णा बाचकर व सुनील चोरमले हे मेंढपाळ वरवंडी (ता.य संगमनेर) येथील स्थापलींग डोंगरावर मेंढ्या चारत होते. यावेळी वरवंडी येथील काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी कारण नसताना मेंढ्यांना मारुन जखमी केले.

मेंढपाळांना धक्काबुक्की केली. हा प्रकार मेंढपाळांनी धनगर समाजाचे मनोहर टेंगळे, यशवंत सेना जिल्हा उप प्रमुख सुभाष हळनोर, एकनाथ बरकडे, गणेश खेमनर, रविंद्र दातीर अशोक जऱ्हाड या कार्यकर्त्यांना सांगितला. कार्यकर्त्यांनी तत्काळ

आश्वी पोलिसांकडे मेंढपाळांना त्वरीत न्याय द्या, अशी मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून सपोनि पवार यांनी मेंढपाळांची फिर्याद घेतली. तातडीने कारवाई करीत अपप्रवृत्तीच्या लोकांना ताब्यात घेवून

त्यांना वर्दीचा हिस्का दाखवित कारवाई केल्याने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मेंढपाळांना न्याय मिळवून देण्यासाठी संगमनेरचे पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे, आश्वीचे पोउनि सोनवणे, सपोनि पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

दरम्यान या प्रकारानंतर नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. अपप्रवृतीच्या लोकांना समज देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान जखमी मेंढ्यांवर औषधोपचारासाठी संबंधीत लोकांकडून आर्थिक भरपाई घेण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office