Ahmednagar News : लाखोंचे श्रद्धास्थान अहमदनगरच्या हरिश्चंद्रगडावरील शिवपिंड दुभंगली ! दहाव्या शतकात झांज राजाने बांधलेय मंदिर..

Ahmednagarlive24 office
Published:
harishachandra gad

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक अशा काही गोष्टी आहेत की ज्या पर्यटकांना भुरळ घालतात. पारनेर तालुक्यातील रांजणखळगे असतील की भंडारदरा धरण असेल, अकोलेतील निसर्ग सौंदर्य असेल.. हे पर्यटकांना भुरळ घालते. यातीलच एक महत्वाचे पर्यटन व भाविकांचे भक्ती स्थळ म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड. येथे भगवान महादेवांची शिवपिंड आहे.

अहमनगरमधील अकोले येथे हरिश्चंद्रगड आहे. हेमाडपंती असणाऱ्या शिवमंदिरात ५ फुटांची जी शिवपिंड आहे तिला मात्र आता तडे गेल्याचे समोर आले असून त्यामुळे ही पिंड दुभंगली आहे. या घटनेमुळे शिवभक्त नाराज झाले आहेत.

दहाव्या शतकात झांज राजाने बांधले मंदिर ! पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष
हे मंदिर साधारणतः दहाव्या-अकराव्या शतकात झांज राजाने बांधले होते. ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या हरिश्चंद्रगडाचा परिसर पुरातत्त्व विभागाकडे असूनही हा विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे भक्तांचे म्हणणे आहे. ५ फूट रुंद व ५ फूट लांबीच्या शिवपिंडीचे जतन व संवर्धन व्हावे अशी मागणी शिवभक्त व पर्यटक करत आहेत.

संवर्धनाचा प्रस्ताव पाठवला
पुरातत्त्व विभागाकडून समजलेल्या माहितीनुसार हरिश्चंद्रगडावरील मंदिर व लेणीच्या कामाचा प्रस्ताव वरिष्ठ विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहिती समजली आहे. मंजुरीनंतर खर्चासंबंधीत प्रस्ताव पाठवणार असल्याचीही माहिती समजली आहे.

शिवभक्तांमध्ये नाराजी
या प्रकारामुळे आता शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. पुरातत्व विभागाने याचे वेळीच जतन करायला हवे होते असे पर्यटक व शिवभक्त म्हणतात.

चांगदेव ऋषींनी चौदाशे वर्ष तप केल्याची आख्यायिका
मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा असून त्या खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवलेली दिसते. या खोलीत `चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केले असल्याची आख्यायिका लोक सांगतात.

कोकण कडा
हरिश्चंद्रगडाचे सर्वांत जास्त आकर्षक म्हणजे कोकण कडा. याठिकाणावरून स्वच्छ हवा असेल तर कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो असे म्हटले जाते. या ठिकावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड, भैरवगड आदी गडांचेही दर्शन होते.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe