अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : स्व.मा.खा.दिलीप गांधींच्या मुलाला धक्का ! ‘अर्बन’ प्रकरणी देवेंद्र गांधी व त्यांच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक व कर्ज घोटाळा प्रकरण राज्यभर गाजले होते. या बँकेचे लायसन्स रद्द झाल्यानंतर व प्रशासक बसवल्यानंतर ही बँक जास्त चर्चेत आली. या बँक घोटाळ्याप्रकरणी अनेक लोक अटकेत आहेत.

आता याच प्रकरणी आणखी एक मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणी देवेंद्र दिलीप गांधी आणि त्यांच्या पत्नी प्रगती देवेंद्र गांधी यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केलेला होता. परंतु आता या प्रकरणी न्यायालयाकडून गांधी कुटुंबियांना धक्का बसला असून त्यांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश पी. आर. सित्रे यांनी नामंजूर केलेत.

अर्बन बँकेतील घोटाळ्याबाबत बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर हा घोटाळा समोर आला व या फिर्यादीनुसार बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळा प्रकरणी कोतवालीत गुन्हा दाखल झाला.आर्थिक गुन्हे शाखेकडून सध्या याचा तपास सुरु असून काही लोक अटकेत आहेत.

त्यातील काहींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज देखील केलेले आहेत. देवेंद्र दिलीप गांधी आणि त्यांच्या पत्नी प्रगती देवेंद्र गांधी यांचा देखील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करणाऱ्यांत समावेश होता.

दरम्यान याबाबत बँक बचाव समिती व ठेवीदारांच्या वतीने स्वतंत्रपणे बाजू मांडण्यात आल्यानंतर पुढील कार्यवाही झाली. न्यायाधीश सित्रे यांनी गांधी पती पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला असल्याने आता शहरात व ठेवीदारांच्या विविध चर्चांना उधाण आले आहे.

अर्बन बँक घोटाळा हा मोठा घोटाळा असून सध्या त्याचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडून सुरु आहे. यात आणखी काही बडे मासे अटक होतील अशी चर्चा सध्या काही नागरिक करत आहेत. दरम्यान सुरु असणाऱ्या कार्यवाहीमुळे पैसे मिळण्याची अशा ठेवीदारांत निर्माण झाली आहे.

Ahmednagarlive24 Office