Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मौलाना (पूर्ण नाव माहिती नाही) व बादशहा ऊर्फ शोएब शकील सय्यद यांच्या विरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या परिवारासोबत राहत्या घराच्या मागे जुन्या पडलेल्या घराच्या जागेवर माझा १३ वर्षीय अल्पवयीन मुलगा त्याच्या गुडघ्यावर बसून त्याचे दोन्ही हात ठेवलेल्या अवस्थेत बसलेला दिसला व तो त्यांच्या तोंडातून काही उच्चार करत असताना पाहिले.
तेव्हा त्याला विचारले असता तो प्रार्थना करीत होता. त्याला हे गावातील मौलाना यांनी शिकविले असल्याचे त्याने सांगितले. हा प्रकार उघडकीस आल्यामुळे मैलानाने मुलाला धमकी दिली की, तु आमच्या धर्मात आला पाहिजे, नाहीतर दोरीने बांधून टाकू, आणि याची वाच्यता केली तर तुमचे गावात एकच घर आहे.
तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकू, अशी धमकी दिली. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात आरोपी मौलाना व सय्यद या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
श्रीरामपूर तालुक्यात अनेक धक्कादायक घटना मागील काळात घडलेल्या आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची आकडेवारी तर चिंताजनक आहे. त्यात आता हा असा प्रकार घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पुढील तपास सुरू आहे.