Ahmednagar News : एका शाळेतील शिक्षिकेच्या पगारातून खोट्या पद्धतीने क्रेडिट सोसायटीची कपात दाखवून १ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात सुनंदा बारकू शेळके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर येथील एका शाळेतील शिक्षिकेच्या पगारातून खोट्या पद्धतीने क्रेडिट सोसायटीची रक्कम कपात दर्शवून शिक्षिकेची तब्बल पावणेदोन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण उघड झाल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.
सहशिक्षिका सुनंदा बारकू शेळके यांच्या पगारासह वेतन श्रेणीतील फरक बँक खात्यावर जमा होत असे. वेतन श्रेणी फरक रक्कम २.७ लाख २३० रूपये मुख्याध्यापिका संगिता पवार यांनी मंजूरीसाठी पाठवली होती.
बील मंजूर होवून शेळके यांच्या खात्यामध्ये रक्कम २६ एप्रिल २०२३ रोजी जमा झाली, मात्र यापैकी १. ७ लाख २३० रूपये कर्ज घेतले नसताना मुख्याध्यापिका पवार यांनी वेतनश्रेणी खर्च बिलामध्ये कर्ज असल्याचे दाखवून रक्कम शाळेच्या बँक खात्यावर जमा करुन, रकमेचा अपहार केला.
तसेच ६८ हजार ४०० रुपये सप्टेंबर २०१९ ते डिसेंबर २०२३ यादरम्यान सोसायटीची कपात दर्शवून अपहार केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सुनंदा शेळके यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी याबाबत संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापिका यांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक मगरे करीत आहेत. या घटनेने शिक्षणक्षेत्रात एकच खळबळ उडाली असून तालुक्यात दिवसभर याचीच चर्चा सुरु होती.