Ahmednagar News : मराठा आरक्षण सर्व्हेक्षणाचे मानधन अनेक शिक्षकांना अद्याप मिळालेले नाही, ते त्वरीत मिळावे, अशी मागणी स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी जिल्हा कार्यकारणीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे, की मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासंदर्भात २३ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान घरोघरी सर्व्हेक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील शहरातील शिक्षकांना सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश मिळाले. शिक्षकांनी निर्धारित वेळेत सर्व्हेक्षण पूर्ण केले.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. सकाळी शाळा भरून सायंकाळपर्यंत सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले. सर्व्हेक्षणाचे मानधन कर्मचाऱ्यांना मिळणार असे पत्रात नमूद होते आणि त्या संदर्भात चर्चादेखील झाली होती; परंतु सव्र्व्हेक्षण पूर्ण होऊनदेखील अद्याप मानधन जिल्ह्यातील काही शिक्षकांना प्राप्त झाले नाही आणि काही शिक्षकांना मानधन प्राप्त झाले आहे.
ही विसंगती दूर व्हावी म्हणून स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली आहे, की याबाबतीत लक्ष घालावे आणि जिल्ह्यातील शिक्षकांना मानधन जमा होण्यासाठी उचित कार्यवाही करावी.
शिक्षकांना शालाबाह्य कामाचा ताण वाढत चालला आहे. यासाठी शासनाने शिक्षकांना वगळून या कामासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमून ही कामे करावीत. यासाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार आहे.
दरम्यान शिक्षकांना अनेकदा शाळाबाह्य कामे सांगितली जातात. त्यामुळे शालेय वातावरणावर परिणाम होतो अशा तक्रारी शिक्षक करत असतात. त्यामुळे शासनाने देखील शिक्षकांना शाळाबाह्य कामे देताना इतरही गोष्टींचा विचार करावा अशी मागणी देखील काही शिक्षक करत आहेत.