अहमदनगर बातम्या

नगरमध्ये माळीवाड्यात गोळीबार ! ‘त्या’ प्रसिद्ध डॉक्टर व त्याच्या सहाय्यकात वाद अन मग…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर शहरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढताना दिसतायेत. आता माळीवाडा परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पक्षी विक्री करणाऱ्या एका दुकानात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

पहिला फायर झाल्यानंतर दुसरा गोळी पिस्तुलात अडकल्याने मोठा अनर्थ टळला. त्यात एक जण किरकोळ जखमी झाला आहे. कोतवाली पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस पथकाला तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

परंतु गोळीबार कोणी केला, कुणावर केला, याबाबत रात्री उशीरापर्यंत पोलिस चौकशी करत होते. दरम्यान, जुन्या वादातून हा गोळीबार झाला असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे माळीवाडा परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगर शहरातील एका प्रथित यश डॉक्टरांकडे सहायक म्हणून असणाऱ्या व्यक्तीचा डॉक्टरांबरोबर जुना वाद होता. याप्रकरणी त्या सहायकाविरोधात डॉक्टरने तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

तरीही संबंधित सहायकाने डॉक्टरला चर्चेसाठी माळीवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील एका दुकानात बोलविले होते. यावेळी डॉक्टर, डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारा सफाई कामगार व जुना सहकारी असे तिघे जण चर्चा करताना एकाने फायर केला.

एक गोळी पिस्तुलातून बाहेर पडली. तर, दुसरी गोळी पिस्तुलात अडकल्याने मोठा अनर्थ टळला. त्यात एक जण किरकोळ जखमी झाला. दरम्यान, पोलिस अधीक्षक राकेश ओला,

उपअधीक्षक अमोल भारती, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Ahmednagarlive24 Office