Ahmednagar News : राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महिलांना महिन्याला १५०० रुपये अनुदान देणारी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. त्यासाठी १५ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
त्यामुळे उत्पन्न व रहिवासी दाखला काढण्यासाठी तलाठी व सेतू कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. महिलांना दिवसभर तलाठी कार्यालयांत ताटकळत बसावे लागत असल्याने त्या संताप व्यक्त करत आहेत.
योजना खूपच चांगली आहे पण सरकार दरबारी या योजनेची अंमलबजावणी करण्याचे नियोजन नसल्याने या योजनेच्या लाभासाठी येथील तलाठी कार्यालयांसमोर विविध दाखले मिळविण्यासाठी गर्दीच गर्दी झाल्याने निराशामय चित्र दिसत आहे. एकीकडे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या दाखल्यांची गरज असते. तलाठी कार्यालयात या काळात गर्दीच- गर्दी असते. त्यामुळे आता गर्दी झाल्याने त्यांचीही गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी एकाच तलाठ्याकडे दोन सज्जांचा पदभार असल्याने महिलांचा दाखले घेण्यासाठी खोळंबा होत आहे.
एका ठाहिकांनी तलाठी असेल तर दुसऱ्या ठिकाणी महिलांचा हेलपाटा होत आहे. आम्ही जातोय पण तलाठीच गायब आहे अशा प्रतिक्रिया महिला देत आहेत. तर तलाठी बिचारे दोन ठिकाणचा कार्यभार पाहत आहेत.
तलाठ्याकडून स्वयंघोषणापत्र मिळाल्यानंतर सेतू कार्यालयात कागदपत्रे जमा केली जातात. परंतु, गेल्या चार दिवसांपासून शासनाचे संकेतस्थळ (वेबसाइट) स्लो झाल्याने अडचणी येत आहेत.
दोन दिवसांत मिळणारे प्रमाणपत्र चार दिवसांनी मिळू लागले आहे. दुसरीकडे शासनाने दिलेल्या मुदतीत कागदपत्रे गोळा करून अर्ज भरला पाहिजे. त्यामुळे गोंधळ उडाला आहे.