Ahmednagar News : पुण्यातील वाहतुकीची कोंडी आणि इतर समस्यांमुळे पुण्याच्या हिंजवाडी आयटी पार्कमधून ३७ कंपन्यांनी अन्य राज्यांत स्थलांतराचा निर्णय घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर पुण्यात अडचणी येत असतील तर या कंपन्यांनी राज्याबाहेर जाण्याऐवजी आमच्या अहमदनगर शहरात येण्याचा पर्याय निवडावा. अशी साद अहमदनगरकरांनी घातली आहे. तसेच यासाठी राज्य सरकारनेही पुढाकार घेत योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नगरमधून करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक हरजितसिंग वधवा यांनी उद्योगमंत्र्यांनाही यासंबंधी पत्र पाठविले आहे. तर काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे यांनीही ही मागणी उचलून धरली आहे.
पुण्यातील वाहतुकीची कोंडी आणि इतर समस्यांमुळे हिंजवाडी आयटी पार्कमधून ३७ कंपन्यांनी अन्य राज्यांत स्थलांतराचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. यासंबंधी पुण्यात चर्चा सुरू असताना आता नगरने त्यात उडी घेत, उद्योजक वधवा यांनी नगरकर आणि उद्योजकांतर्फे या कंपन्यांना नगरला येण्याचे निमंत्रण दिले आहे.
वधवा यांनी म्हटले की, अहमदनगर हे पुणे विमानतळ, शिर्डी विमानतळ, छत्रपती संभाजीनगर विमानतळाजवळ असलेले आणि महामार्गाने जोडलेले एक मध्यम शहर आहे. येथे अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये, बीसीएस, एमसीएस महाविद्यालये आहेत. शहरात कुशल लोकसंख्या चांगली असून शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर जास्तीत जास्त २० ते ३० मिनिटांत पूर्ण करता येते.’ ‘पुण्याच्या तुलनेत राहण्याची संस्कृती आणि राहण्याचा खर्च खूपच कमी आहे. पुण्यातील कंपन्यांना आपली गळचेपी होते आहे असं वाटत असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करण्यास तयार आहोत. आमचे राजकीय नेते तसेच प्रशासक त्यांना चांगल्या पायाभूत सुविधा देऊ शकतात.
पाच लाख तरुणांना रोजगार
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे की अनेक मोठमोठ्या आयटी कंपन्या पुण्यात आहेत. एकट्या हिंजवडीत आयटी हबमध्ये सुमारे पाच लाख तरुणांना रोजगार आहे. केवळ ट्राफिक जामच्या समस्येमुळे सदर कंपन्या महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे याबद्दल उद्योग मंत्री सामंत यांना प्रसारमाध्यमांनी विचारले याबाबत त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी देखील वेदांता फॉक्सकॉन कंपनी गुजरातमध्ये नेण्यात आली.
ही कंपनी पुणे जिल्ह्यात उभारली जाणार होती. यामुळे लगतचा जिल्हा असल्याने नगरच्या तरुणांना देखील रोजगार मिळणार होता. मात्र तो मिळू शकला नाही. नगरच्या तरुणांच्या रोजगारासाठी विस्तारित एमआयडीसी मंजूर करत आयटी पार्कसाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन (एसईझेड) उभारणीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे काळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.