Ahmednagar News : … म्हणून वन्यजीव विभागाने पर्यटकांसाठी सांदण दरी केली बंद!

Pragati
Published:

Ahmednagar News : आशिया खंडातील सर्वात खोल समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील सांदण दरीसाठी पर्यटन पावसाळ्याचे चार महिने बंद करण्यात आले आहे. कारण सांदण दरीच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस पडत असतो.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरीतून पाणी वाहात असल्याने पर्यटकांसाठी सांदण दरी पावसाळ्यात चार महिने बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे वन्यजीव विभागाने सांगितले आहे. त्यामुळे या काळात पर्यटकांना सांदण दरी पाहता येणार नाही.

सध्या पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे अनेकांची पावले पर्यटन स्थळाकडे वळली आहेत. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसर म्हणजे निसर्गाची अनमोल देणगीच आहे. त्यामुळे या भागात नेहमी वर्दळ असते.

भंडारादरा धरणास विल्सन धरण असेही ओळखले जाते. प्रवरा नदीवर आणि जमीन सपाटीपासून १५० मीटर उंचीवर आहे. भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.
भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. त्याचसोबत सांदणदरी हे ठिकाण कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य व सह्याद्री पर्वतरांगेमधील एक थंड हवेचे ठिकाण आहे.

बाजूलाच रतनगड हा किल्ला आहे. येथील वृक्षवल्ली ही सदाहरित असल्याने या ठिकाणी हवामान हे वर्षभर थंडगार असते. येथे शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात ऑक्सीजनची मात्रा आढळत असल्याने मानवी शरीरासाठी ते एक औषधाप्रमाणे काम करते. त्यामुळे अशा ठिकाणी मुक्कामास राहणे हे मानवी आरोग्यास फायदेशीर आहे. त्यामुळे सांदण दरीसाठी कायमच पर्यटकांची गर्दी असते.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात असणाऱ्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभ अभयारण्यात साम्रद येथे आशियातील सर्वात खोल दरी सांदनदरी आहे. या दरीच्या पर्यटनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातुनही हजारो पर्यटक सांदन दरीला भेट देत असतात.

या ठिकाणचा टेंट व्यवसाय ही अतिशय प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्यटकांची कायमस्वरूपी सांदणदारीच्या ठिकाणी रेलचेल असते. भंडारदऱ्याला आता पावसाचे वेध लागण्यास सुरुवात झाली असून पावसाळ्यात सांदण दरीच्या प्रवेशद्वारातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहात असते. सांदण दरीसाठी कायमच पर्यटकांची गर्दी असल्याने अघटीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी वन्यजीव विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्याचे चार महिने सांदण दरीमध्ये कोणत्याही पर्यटकास प्रवेश मिळणार नसल्याची माहिती वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe