अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : आत्मा हा कायम असतो आणि ‘हा’ आत्मा तुम्हाला सोडणार नाही : शरद पवार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सत्ता मिळण्याची शक्यता नसते तेव्हा माणूस बेफाम होतो. हेच मोदींच्या वक्तव्यांमधून पाहायला मिळाले. राजकीय टीका करताना मर्यादा ठेवायला हव्यात; मात्र निवडणुकीत मला ‘भटकती आत्मा’ म्हणाले. पण त्यांना माहीत नसेल की आत्मा हा कायम असतो आणि हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही.

श्रीराम मंदिर झाले,चांगले झाले. मीही कधी अयोध्येला गेल्यावर मंदिरात जाईन. श्रीरामांचा सन्मान ठेवेनः पण राजकारणात याचा फायदा कधीही घेणार नाही. मोदींनी तो घेण्याचा प्रयत्न केला, पण अयोध्येतील जनतेनेही हे मान्य केले नाही. त्यामुळे आता मोदी सरकार आणि मोदी गॅरंटी राहिलेली नाही, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले कि, पंतप्रधान हा एका पक्षाचा नसतो, तो देशाचा असतो. देशातील सर्व घटकांचा असतो. मात्र प्रचारात त्यांचा विश्वास संपादन करायला मोदी कमी पडले. त्यामुळे जनतेने त्यांना बहुमत दिले नसतानाही त्यांनी तेलगू देसम आणि जेडीयूला सोबत घेत सरकार स्थापन केले.

लोकसभेत ज्याप्रमाणे महाराष्ट्राने विश्वास दाखवला, त्याप्रमाणेच विधानसभेलाही जनता आपल्यासोबत राहील, आगामी काळात आपलेच सरकार सत्तेत येईल. ‘संसदेत नीलेश लंके यांच्या रूपाने नवा चेहरा पाठविला आहे.निवडणुकीदरम्यान कोणीतरी बोलले होते, की इंग्रजी बोलता यायला पाहिजे; मात्र मी नीलेशला सांगितले, की संसदेत मराठी, हिंदी व इतर भाषाही चोलता येतात,’ असे सांगून पवार यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार घेतला. ‘पण संसदेत लंके काय बोलतील याचा भरवसा नाही,’ अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री विजयसिंह मोहिते, अनिल देशमुख, आमदार राजेश टोपे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार उत्तमराव जानकर फौजिया खान, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह पक्षाचे आठ नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते.

 

Ahmednagarlive24 Office