Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्याचा व सोबतच येणाऱ्या पावसाचा मोठा फटका अहमदनगर जिल्ह्याला बसत आहेत. पावसापेक्षा वादळी वारे जास्त असल्याने नुकसान जास्त होत आहे.
मागील महिन्यातही मोठे नुकसान अहमदनगर जिल्ह्यात पाहायला मिळाले होते. आताही मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्याचे धुमशान सुरूच आहे. काल मंगळवारी कोपरगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांत वादळीवाऱ्याचा तडाखा बसला.
सोबतच किरकोळ स्वरुपाचा पाऊस झाला. विजांचा कडकडाट व कानठाळ्या बसतील, अशा मेघगर्जना होत होत्या. त्यातच वीज पडल्याने बक्तरपूर येथे एक गाय, एक बैल व तीन मेंढ्या दगावल्या. चासनळी, वडगाव या ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले.
कोपरगाव शहरात सायंकाळी किरकोळ स्वरुपाचा पाऊस झाला. वादळी वारे वाहात होते. विजांचा कडकडाट आणि कर्णकर्कश आवाज होत राहिले. तालुक्यातील चासनळी, वडगाव, बक्तरपूर, वारी, कान्हेगाव, शिंगवे, संवत्सर, शिंगणापूर, भोजडे, धोत्रे, कोकमठाण, पोहेगाव, सोनेवाडी, चांदेकसारे येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथील मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील बक्तरपूर परिसरात थांबले होते. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान तीन मेंढ्या, एक गाय, एक बैल यांच्यावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
शेतीपिके व फळबागा झोपल्या
बक्तरपूर गावाला या वादळी वाऱ्याचा फटका सर्वाधिक बसला. असनेक शेतकऱ्यांचा साठवलेला मोकळा कांदा भिजला. गोठ्याचे शेड गायींच्या अंगावर पडले. काहींचे पडवीचे पत्रे उडून गेले. काही शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागेतील झाडे उन्मळून पडली.
पाऊस अत्यल्पच पण वादळाचा कहर
मंगळवारी कोपरगाव तालुक्यातील पाच मंडळांत पावसाची नोंद झाली. पावसाचे प्रमाण अत्यल्प होते परंतु, वादळी वारे वाहात होते. त्यामुळे घराचे पत्रे उडाले. झाडे पडली. तसेच वादळाने जवळपास ३५ पोल खाली पडले. तारा जमिनीवर आल्या. त्यामुळे गावे अंधारात होती.