Ahmednagar News : अहमदनगर शहरासह जिल्हाभरात उष्णता चांगलीच वाढली आहे. वाढत्या उष्णतेने जनमानसाची काहिली वाढली आहे. जवळपास तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसवर गेला आहे. तापमान ३८ अंश सेल्सिअसवर गेल्यानंतर उष्णतेची झळ जाणवू लागली आहे. (weather update)
एकीकडे तापमानाचा पारा वाढत असतानाच ७ ते ९ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यासह पावसामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
मार्च महिन्याच्या पंधरवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. ५ मार्चला ३५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानाच्या पाऱ्यात दोन अंशांनी वाढ झाली आहे. गेल्या ७ दिवसांपासून तापमानाचा पारा ३८ अंशावर गेला असून, शुक्रवारी ३८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.
उन्हाच्या तीव्रतेमुळे बाजारपेठेतही शुकशुकाट जाणवत आहे. उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी प्रशासनाने दक्षता घेण्याच्या सूचना नागरिकांना केल्या आहेत. दरम्यान आता उष्णतेचा कडाका वाढला असून अहमदनगर जिल्ह्यात ७ ते ९ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलक्या, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे प्रशासनाने या तीन दिवसाच्या कालावधीत वीज चमकत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये, असे आवाहन केले आहे.
आंब्याचे होऊ शकते नुकसान
सध्या काही ठिकाणी आंबा अद्याप पाडी लागलेला नाही. तसेच काही भागात लोणच्यासाठी कैरीसाठी गावरान आंबा राखून ठेवला जातो. जर वादळी वारा सुटला तर या आंब्यांचे नुकसान होऊ शकते असा अंदाज आहे. दरम्यान काही ठिकाणी पाणी नसल्याने पिके सुकून चालली आहेत. पाऊस जर झाला तर त्या ठिकाणी पिकांना नवसंजीवनी मिळेल.