अहमदनगर बातम्या

तुफान पावसाने अहमदनगरमधील ‘या’ दोन नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, आमदारांची धाव, गावांना सतर्कतेचा इशारा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News :  प्रवरा म्हाळुंगी व आढळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तिन्ही नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रवरा नदीकाठी जाऊन पूरस्थितीची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

गेल्या दोन दिवसांपासून अकोले व संगमनेर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

आ. थोरात यांनी प्रवरा नदी काठावर जाऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार थोरात यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

त्याचबरोबर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तीन्ही नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. अशा काळामध्ये नागरिकांनी अधिक सतर्क रहावे.

तरुणांनी नदीकाठी जाण्याचा किंवा सेल्फी घेण्याचा मोह टाळावा. याचबरोबर गणेशोत्सव काळातही अतिउत्साहीपणा न दाखवता अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार थोरात यांनी यावेळी केले.

गोदातिरीही सतर्कतेचा इशारा
नाशिक जिल्ह्यातील नांदुर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरु असून नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते.

त्यामुळे कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील गावातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office