Ahmednagar News : विद्यार्थ्यांनो आता पास काढण्याचे टेन्शन विसरा ; ‘एसटी’ राबवत आहे ‘ही’ विशेष मोहीम !

Pragati
Published:

Ahmednagar News : सध्या नवीन नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील सर्व शाळा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खासगी वाहनासह एसटीबसमध्ये देखील विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीकडून सवलतीच्या दारात पास दिले जातात. त्यामुळे कमी पैशात या विद्यार्थ्यांना एसटी बसने प्रवास करता येतो.

यापूर्वी हे पासेस काढण्यासाठी विद्यार्थ्यांना आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून घ्यावे लागत असत. यात त्यांचा मोठा वेळ वाया जात असत. तसेच एकाच वेळी जास्त विद्यार्थी पास काढण्यासाठी आले असता गर्दी होऊन अनेकांना विनापास परत जावे लागत असे. मात्र आता शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत.

तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. यासंदर्भात १८ जूनपासून एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेषमोहीम राबवण्यात येत आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६ टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो.

त्याचप्रमाणे शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घेतले जात असत. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही.

त्यांच्या शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत, जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही.

तत्पूर्वी सर्व शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनी- विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe