Ahmednagar News : कोपरगाव येथील बेटातील श्री शुक्राचार्य मंदिरात संवर्धनाचे काम सुरू असताना गाभाऱ्याच्या वर नुकतेच एक तळघर सापडले. नेमके हे तळघर कशाचे आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आतापर्यंत १२ बाय १२ जागेत सहा फूट उंचीची पोकळ जागा आढळून आली आहे. त्यामुळे हे त्या काळचे ध्यान मंदिर असावे, असा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून येथे मंदिर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्या उपस्थितीत नुतनीकरणाचे काम सुरू आहे.
जगातील एकमेव असलेले पुरातन गुरू शुक्राचार्य महाराज मंदिराच्या गाभाऱ्याच्या वरील भागात १२ बाय १२ आकाराचे ध्यानमंदिर आढळुन आले आहे. ते पाहाण्यासाठी भाविक, नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. याचीदेखील माहिती मंदिर समितीच्या वतीने काल मंगळवारी सकाळी ११ वाजता शुक्राचार्य मंदिरात पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली आहे.
यावेळी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड म्हणाले, सध्या श्री गुरू शुक्राचार्य महाराज पुरातन मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यावेळेस काम करताना तीन आठवड्यापूर्वी ते आढळून आले. मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरू शुक्राचार्य मंदिर गाभाऱ्याची दुरूस्ती व सुशोभिकरणाचे काम नाशिक येथील उद्योगपती यांच्या सहकार्याने पूर्णत्वास जात आहे. सभामंडपाच्या वरील भागात कोणी कधीही न पाहिलेली छोटीसी खिडकी आढळून आली. ती खिडकी उघडली असता सभामंडपाच्या गच्चीच्या खाली १२ बाय १२ या जागेत सहा फूट उंचीची पोकळ जागा आढळून आली.
मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ स्थापन झाल्यापासून गेल्या वर्षापासून मंदिर परिसरात विविध बदल केले जात आहेत. पूर्वीचा श्री क्षेत्र बेट हा दंडकारण्याचा एक भाग होता. चहुबाजुंनी त्याला पाण्याने वेढले होते. या पावन भूमीत भार्गव ऋषींचे पूत्र कवी म्हणजेच गुरू शुक्राचार्य महाराज यांचे कर्मस्थान असून त्यांच्या वास्तव्याने तपश्चर्यने पावन व पवित्र झालेला हा परिसर आहे.