Ahmednagar News : पाणी नसल्याने ऊस शेती संकटात, खोडवा नांगरण्याची शेतकऱ्यांवर वेळ, उसक्षेत्र घटून कापूस व सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

Pragati
Published:

Ahmednagar News : यंदा पाऊस फारच कमी झाला. त्यात जिल्ह्यातील काही धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याची प्रचंड कमतरता जाणवत आहे. त्याचा परिणाम असा झाला की, जिल्ह्यातील महत्वाचे नगदी पीक असणारे ऊस पिकाच्या उत्पन्नावर परिणाम झाला.

उसाला पाणी नसल्याने जिल्ह्यातील काही भागात पाचव्या व सहाव्या महिन्यात होणारी नवीन उसाची लागवड सोडाच, खोडवासुद्धा नांगरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यामुळे ऊस क्षेत्रात कमालीची घट झाल्याचे सांगितले जात आहे. यंदा कडक उन्हाळ्याचा अनुभव सर्वांनी घेतला; मात्र कृषी क्षेत्रावर त्याचा मोठा विपरीत परिणाम झाल्याने इतर रब्बी हंगामातील पिकासोबत उसाच्या क्षेत्रालाही पाण्याचा तुटवडा जाणवला.

त्यात कडक उन्हाने ऊस पिके तग धरू न शकल्याने पिके जळाली. त्यात सोयीस्कर ऊस तोडणी कमी कालावधीत होत असल्याने बहुतेक शेतकरी मे-जून मध्ये नवीन उसाच्या लागवडीसाठी प्राधान्य देत असतात, मात्र चालू वर्षी पाण्याने लवकरच ठेंगा दाखवल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

जमीन खाली ठेवावी लागली आहे. तसेच पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता शिल्लक राहिलेल्या खोडव्यावरही नांगर फिरवावा लागला आहे. पाण्याअभावी एक एकर खोडवा नांगरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे किमान एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून नफा तर लांबच राहिला, तोटा सहन करायची वेळ आली आहे अशी प्रतिक्रया काही शेतकरी देतायेत.

कापूस व सोयाबीनचे क्षेत्र वाढणार
शेकडो हेक्टर क्षेत्र आजमितीस खाली झाले आहे. त्याचा थेट परिणाम चालू खरीप हंगामात सोयाबीन व कापूस क्षेत्राचा पिकांच्या वाढीवर होणार असल्याचे मत जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

परिणामी चालू खरीप हंगामात कापूस व सोयाबीन विक्रमी लागवड होण्याचे संकेत मिळत असून त्या खालोखाल पशुधनाची चारा पिके व मका यास प्राधान्य असल्याचा शेतकरी वर्गाचा अंदाज आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe