Ahmednagar News : उन्हाचा कडाका वाढला अन दूध उत्पादनाला फटका बसला; दूध उत्पादनात इतकी झाली घट

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : देशात शेतीसोबतच पशुपालनाचा व्यवसायही बहुतांश लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. सर्वसाधारणपणे खेडेगावात राहणारे लोक शेतीच करतात. मात्र अलीकडच्या काळात शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन देखील करतात. शेतीमध्ये पशुपालनाचीही खूप मदत होते.

गाई-म्हशींचे दूध विकले जाते. शेण खत तयार करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे जमिनीची उत्पादक क्षमता वाढते. त्यामुळे दूग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागाचा आर्थिक कणा बनला आहे. मात्र सध्या वाढलेल्या उन्हामुळे दुभती जनावरे कमी चारा खात आहेत. त्यामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. अशा स्थितीत दूध उत्पादक शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा असलेला दूग्ध व्यवसाय दुष्काळाच्या झळा आणि उन्हाच्या वाढत्या तडाख्याने अडचणीत येत आहे. गेल्या हंगामात पावसाने सर्वच ठिकाणी पाठ फिरवल्यामुळे निर्माण झालेली चारा व पाणी टंचाई, पशुखाद्याच्या वाढत्या किमती यामुळे पशुधन सांभाळण्याची कसरत दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

यातच वाढत्या उन्हामुळे दूध उत्पादनात ४४ हजार लिटर इतकी घट झाली आहे. तरी देखील योग्य चारा व्यवस्थानामुळे फार मोठ्या प्रमाणात ही घट झाली नाही. दूध उत्पादनात नगर जिल्ह्यात राज्यात अग्रेसर आहे. शेती व्यवसायाबरोबरीने दूध व्यवसाय जिल्ह्यात असल्याने शेतकऱ्यांची अर्थव्यवस्थाच या व्यवसायवर अंवलबून आहे. जिल्ह्यात छोट्या-मोठ्या जनावरांची संख्या सुमारे १६ लाख आहे.

शेळ्या-मेंढ्यांची संख्या १४ लाख ७९ हजार आहे. दुभत्या गाई-म्हशींची संख्या ५ लाख ६४ हजार २६४ आहे. मागील वर्षी वरूणराजा रुसल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण विस्कळीत झाले. मागीलवर्षी एप्रिल २०२३ मध्ये जिल्ह्यात दूध संकलन ४७ लाख ८८ हजार होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे एप्रिल २०२४ मध्ये ४७ लाख ४४ हजारावर आले.

दुग्ध व्यवसाय विभागाच्या माहितीनुसार मार्च २०२४ मध्ये ४७ लाख २० हजारावर म्हणजे सुमारे ६६ हजार लिटरने घटले होते. मात्र गेल्या महिन्यात त्यामध्ये २४ हजाराने पुन्हा वाढ झालेली आहे. गाईंसाठी ३० ते ३२ सेल्सिअसपर्यंत तपमान असणे आवश्यक असते. परंतु सध्या ४२-४३ पर्यंत तापमान गेल्याने गाईच्या दूध देण्यावर परिणाम झाला आहे. यावर शेतकऱ्यांनी आपापल्या परीने उपाययोजना केल्या जात आहेत.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe