Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ताबेमारी हा प्रश्न नेहमीच ऐरणीवर आलेला दिसतो. या ताबेमारीमुळे सर्वमान्य लोक जेरीस आले आहेत. बऱ्याचदा या ताबेमारी करणाऱ्या लोकांना कुणाचे अभय आहे का? असाही आरोप केला जातो.
आता एक देवस्थानच्या जमिनीवर ताबेमारी केल्याची घटना समोर आली आहे. सदगुरु देवेंद्रनाथ महाराजांचे पादुका मंदिर असलेल्या बहिरवाडी (ता. नेवासा) येथील देवस्थानच्या मालकीच्या जमिनीवर एका व्यक्तीने ताबा मारून या जमिनीतील माती गेल्या ३ वर्षापासून विकत आहे.

नाथसेवा अथवा अन्य धार्मिक कार्य करायला गेलेल्या नाथभक्तांवर खोटे गुन्हे दाखल करत आहे. या व्यक्तीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी राज्यभरातील नाथभक्तांनी २४ जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
सदगुरु देवेंद्रनाथ महाराज यांनी धार्मिक कार्यासाठी बहिरवाडी येथे गट नं. १३ व १४ मध्ये जमीन खरेदी केलेली होती. ती जमीन आजही त्यांच्या वारसांच्या नावावर आहे. परंतु त्या ठिकाणी भीमा शिंदे हा व्यक्ती गेली ३ वर्ष त्या ठिकाणी जमिनीतील माती विकतोय त्या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. भक्त गेल्यानंतर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतोय.
काही भक्तांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यावेळी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी त्या व्यक्तीला १० फेब्रुवारी २०२१ रोजी अवैध उत्खनन केल्या प्रकरणी ७६ लाख ६० हजारांचा दंड ठोठावला होता. मात्र त्यावर पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही.
महाराष्ट्रात हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे असताना जर देवस्थानच्या जमिनी धार्मिक कार्यासाठी घेतलेल्या असतील त्या ठिकाणी ते कार्य न होता जर लोक त्या जमिनी बळकवायला लागले आणि प्रशासन कुठलीही कारवाई करत नसेल तर अशा प्रशासनाच्या विरोधात सदगुरु देवेंद्रनाथ महाराज यांचे सर्व शिष्य गण, महिला भगिनी २४ जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
भगवी वस्त्र धारण करून शासनाला व प्रशासनाला सदबुद्धी येण्यासाठी त्या ठिकाणी सर्व धार्मिक कार्यक्रम करणार आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व धार्मिक कार्यक्रमासोबत उपोषण करणार असल्याचा इशारा श्री. नवनाथ सेवा मंडळ, बोल्हेगाव येथील मच्छिंद्र नेहे, लक्ष्मण कुलथे यांच्या सह वाळकी, मढी येथील व राज्य भरतील नाथ भक्तांनी दिला आहे.