Ahmednagar News : अमली पदार्थ हे समाजातील तरुण पिढी बरबाद करण्याचे, संपवण्यासाठी जबाबदार असे घटक आहेत. याची विक्री करणे किंवा ते बाळगणे हा गुन्हाच आहे. असे पदार्थ व त्यांची विक्री शक्यतो मोठा शहरात होताना आपण बातम्यांत पाहायचो.
पण नगरकरांनो आता हे लोन अगदी ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. अलीकडील काळात पोलिसांच्या काही कारवाया पहिल्या तर लक्षात येईल की अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अमली पदार्थ जप्त करण्याच्या कारवाया झालेल्या आहेत. नुकतीच झालेली कारवाई पाहिली तर पुणे, अहमदनगरच्या पोलिसांनी संगमनेरात येऊन कारवाई करत बनावट ताडी बनवण्यासाठी लागणाऱ्या केमिकलचा साठा, हेरॉइन, गांजा जप्त केला होता.
पुणे पोलिसांनी वेल्हाळे शिवारात येऊन कारवाई केली. दोन हजार २१७ किलो तयार क्लोरल हायड्रेट, तसेच ते तयार करण्यासाठी लागणारे रिअॅक्टर, मशिनरी, काचेची उपकरणे व इतर साहित्य जप्त करत कारखाना सील केला होता. केमिकलमिश्रित ताडी पिल्याने राज्यात अनेकांनी जीव गमावल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतः दक्ष राहात ग्रामीण भागात त्याचा शिरकाव होऊ नये, त्याची पाळेमुळे खोलवर रुजली जाऊ नयेत यासाठी सतर्क होऊन त्या दृष्टीने कारवाई करायला हवी.
संगमनेरात अमली पदार्थांमध्ये गांजा मोठा प्रमाणात विकला जातो. गांजाची सिगारेटसुद्धा अनेक ठिकाणी मिळते. परंतु, त्यावर कुठलीही ठोस कारवाई पोलिसांकडून होत नसताना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस संगमनेरात येतात आणि अमली पदार्थामध्ये समावेश असलेले हेरॉइन, गांजा जप्त केला जातो. संगमनेरात पहिल्यांदा हेरॉइन जप्तीची कारवाई झाली असल्याचे बोलले जाते आहे.
नशेखोरांच्या कुप्रसिद्ध दुनियेत ‘एमडी’, ‘हेरॉडन’ हे अमली पदार्थ अधिक प्रसिद्ध आहेत. संगमनेरात कारवाई केलेले ३६ ग्रॅम हेरॉइन हे ७२ हजार रुपयांचे होते. म्हणजे एक ग्रॅम हेरॉइन दोन हजार रुपयांचे झाले. गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीकडे ते कुठून आले. तसेच, इतके महाग अमली पदार्थ खरेदी करणारे कोण आहेत? याचाही सखोल तपास पोलिसांनी करणे गरजेचे आहे.
दुष्परिणाम होण्याआधीच पालकांनी सजग होण्याची गरज
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अमली पदार्थांची विक्री करणारे त्यांच्यापर्यंत पोहोचायला नकोत. अमली पदार्थांविरोधातील लढाई सर्वांनी एकत्रितपणे लढायची आहे. हे जाळे ग्रामीण भागात पोहोचू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे असे काही शिक्षक सांगतात.
एखाद्या अमली पदार्थाचे व्यसन लागल्यानंतर ते सुटणे फार अवघड असते. त्यामुळे पालकांनी त्यांच्या मुलांचे प्रबोधन करणे देखील गरजेचे झाले आहे.