Ahmednagar News : विधीमंडळाचे अधिवेशन संपेपर्यंत शेतकऱ्यांच्या दुधाला ४० रुपये दर, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व इतर रास्त मागण्यांबाबत शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलन तीव्र केले जाईल.
योग्य वेळी मुंबईला जाणाऱ्या दुध व भाजीपाल्याचा पुरवठा बंद करू, असा इशारा माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर राजू शेट्टी, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक राजू शेटे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
याप्रसंगी शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी यापुढेही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बरोबर राहावे. स्वामीनाथन सूत्र काढल्यास दुधाचा भाव ४५च्या पुढे जातो. चारा, पशुखाद्य, खतांचे दर वाढत आहेत, परंतु दुधाचे दर रोज कमी होत आहेत. त्याचप्रमाणे याच शासनाने कांद्याची निर्यातबंदी करून दर पाडले. सोयाबीन, कापूस, तुर व इतर शेतमाल दर पाडण्यासाठी बाहेरून आयात केला. शेतकऱ्यांचे पूर्णपणे वाटोळे केले. या शासनाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
सरकार उद्योगपतींचे १४ लाख ५६ हजार कोटींचे कर्ज राईटऑफ करते. मात्र शेतकऱ्यांचे ३ लाख कोटीचे कर्ज माफ करण्यास सरकार तयार नाही. हा दुजाभाव कशासाठी? असा सवाल करतानाच त्यांनी शासनाला अधिवेशन काळात संयुक्तिक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. आमदार तनपुरे म्हणाले मुख्यमंत्री व संबंधित मंत्री शेतीच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.
शेतकऱ्यांनी लोकसभेला दणका दिला, म्हणून अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद न करता खोटी आश्वासने दिली. फसवणूक शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने या भूलथापांना आता शेतकरी बळी पडणार नाही. शासनाकडून जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे.
दुधासाठी यापुढील मोर्चा दुग्धविकास मंत्र्यांच्या घरावर नेण्याचा इशारा आमदार तनपुरे यांनी यावेळी दिला. स्वतःकडे १० वर्षे आमदारकी असताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी काही केले नाही, आता मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करतात व शेतकऱ्यांचा कळवळा दाखवून स्वतःला दूधवाला सांगून फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
खेवरे यांनी या पुढील आंदोलन रस्त्यावर न करता दुग्धविकास मंत्र्यांच्या तालुक्यात करून मंत्र्यांना बाहेर पडू दिले जाणार नाही, असा इशारा दिला.
राजू शेटे यांनी पॅकिंग दुधाला वर्षभर सारखा भाव असताना शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव मात्र २२ रुपयेपर्यंत येतात, शेतकऱ्यांना फसविण्याचा एकमेव धंदा शासनाकडून होत असल्याचा आरोप केला.
यावेळी रवींद्र मोरे, प्रकाश देठे, संतोष आघाव, मच्छिंद्र सोनवणे आदींनी शासनावर कडाडून टीका केली. राहुरी बार असोसिएशनच्या वतीने अॅड. बाचकर, अॅड. मुसमाडे, अॅड. राहुल शेटे आदींनी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.
शेतकऱ्यांनी डफडे वाजवत जनावरांसह रस्त्यावर ठाण मांडले होते. यावेळी शासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर दूध ओतण्यात आले. एक तास चाललेल्या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंना दुतर्फा वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दिंड्यांचेही मार्गक्रमण थांबलेले होते.
यावेळी बाबासाहेब भिटे, सुजित वाबळे, बाबासाहेब भिडे, सचिन म्हसे, विजय तमनर, राहुल तमनर, अनिल पेरणे, संदीप आढाव, नंदकुमार तनपुरे, ताराचंद तनपुरे, अनिल इंगळे, पंढरीनाथ पवार, संजय पोटे, दिलीप इंगळे, प्रकाश भुजाडी, विलास शिरसाठ, विजयराव डौले, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष भारत तारडे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बाचकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष आघाव यांनी केले.