राहुरी येथील वकील दांपत्याच्या खून प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी काही आरोपी अटकेत आहेत. आता याबाबत एक महत्त्वाची अपडेट आली आहे. या घटनेचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे देण्यात आला आहे.
राहुरी येथील ॲड. राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲड. मनीषा राजाराम आढाव या वकिल दाम्पत्यांचे दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी अपहरण करुन त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेतील किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग, रा. उंबरे, भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे, रा. येवले आखाडा, शुभम संजीत महाडिक, रा. मानोरी, हर्षल दत्तात्रय ढोकणे, रा. उंबरे, बबन सुनिल मोरे, रा. उंबरे या पाच आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेऊन गजाआड केले.
या घटनेतील तीन आरोपींनी तात्काळ राहुरी येथील न्यायालया समोर कबूली जबाब देऊन गुन्हा कबूल केला. यातील किरण दुशींग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुणाचे दोन गुन्हे तसेच चोरी, दरोडे, घरफोडी, रस्तालूट, जिवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर वकिल दाम्पत्यांचे हत्याकांड हे २० हजार रुपयांच्या फिसाठी झाले. त्यानंतर पाच लाख रूपए खंडणीसाठी झाले. अशी पोलीस प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात आढाव दाम्पत्यांचे मृतदेह मिळून आले तेव्हा त्यांच्या अंगावर पाच ते सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागीने होते.
त्यामुळे सदर हत्याकांड हे फि किंवा खंडणीसाठी झालेले नसून पोलिस प्रशासनाकडून तपास भरकटण्याचे काम सुरु असल्याचा आरोप वकिल संघाकडून करण्यात आला होता. दि. २९ जानेवारी रोजी नगर जिल्ह्यातील सर्व वकिलांनी राहुरी येथे हजर राहुन तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध सभा घेतली. तसेच पोलिस तपासा बाबत शंका व्यक्त करून सदर तपास सीआयडी कडे द्यावा. अशी मागणी केली होती.
आज दिनांक ३० जानेवारी रोजी या घटनेचा तपास सीआयडी कडे देण्यात आला. सदर आदेशात म्हटले कि, अहमदनगर जिल्हयातील राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रजि. नं. ७५/२०२४ भादंवि कलम ३६३, ३०२, २०१ अन्वये दाखल गुन्हयाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे वर्ग करण्यात येत आहे.