Ahmednagar News : ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या अहमदनगर शहराचा आज ५३४ वा स्थापना दिन. मलिक अहमदशहा याने याने शहराची स्थापना केल्याचा इतिहास आहे. या अहमदनगर शरहाला अत्यंत जुनी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
अगदी निजामशाही, शिवरायांच्या कालावधीपासून तर पेशव्यांच्या कालावधीपर्यंत नगरला इतिहास आहे. इतिहासात डोकावून पाहिले तर लक्षात येते की, २८ मे १४९० रोजी मलिक अहमदशहा याने ‘कोटबाग निजाम’ हा राजवाडा बांधून सीना नदीकाठी वसाहत स्थापन केली.
अहमदशहाच्या नावारून या शहराला ‘अहमदनगर’ हे नाव मिळाले. विशेष म्हणजे, अहमदशहा (राजा) यांच्याशिवाय सेनापती, प्रधान आणि काझी या सर्वांच्याच नावात ‘अहमद’ होते. या रंजक इतिहासाची माहिती ‘अहमदनगरची निजामशाही’ या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते.
अहमद निजामशहाने आपल्या प्रजेच्या सुख-सोयींकरिता एक शहर वसवण्याचे ठरवले. राजधानी तयार करण्यासाठी जुन्नर व इतर भागातून कारागीर, शिल्पकार आणि इतरांना मलिक अहमदने बोलावून घेतले. शहरातील बाग, बागायत, घोडे आदींची बांधणी त्याने आपल्या देखरेखीखाली केली.
त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली , अल्पावधीतच शहर तयार झाले. या शहराचे नाव काय ठेवायचे, याचा विचार करीत असताना मलिक अहमदला गुजरातचा सुलतान अहमद याच्या नावावर अहमदाबाद शहर वसल्याची आठवण झाली.
गुजरातचा सुल्तान, मुख्य प्रधान, मुख्य काझी यांचीही नावे अहमद होती. तसाच योगायोग या शहरात होता. बादशहा, काझी व कोतवाल यांची नावे अहमद होती. हा योग चांगला असल्याने नूतन राजधानीचे नाव अहमदनगर असे ठेवण्यात आले, असा संदर्भ ‘अहमदनगरची निजामशाही’ या पुस्तकात नमूद केलेला आहे. विशेष म्हणजे हे नाव धार्मिक एकोपा जपणारे होते.
‘पुण्यश्लोक अहिल्यानगर’चा प्रस्ताव
नुकतेच या शहराचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यानगर’ करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केला आहे. आता पुढे जाऊन केंद्रात हा प्रस्ताव गेला तर त्याठिकाणी हा प्रस्ताव मंजूर जर झाला तर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यानगर’ असे होईल असे म्हटले जाते.