अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : नगर ठरतेय ‘मेस’चे केंद्रबिंदू, व्यवसायातून शहरात लाखोंची उलाढाल, योग्य नियोजनाने अनेकांना पैसे कमवण्याची संधी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर शहरामध्ये विविध व्यवसाय वृद्धिंगत होत आहेत. आता शहरात मेस व्यवसायाला देखील अच्छे दिन आले आहेत. ग्रामिण भागातून नगरमध्ये शिक्षणसाठी भरपूर विद्यार्थी आले आहेत. त्याचप्रमाणे एमआयडीसीमध्ये किंवा इतर ठिकाणी अनेक कामगार काम करण्यासाठी वास्तव्यास आहेत.

त्यामुळे शहरात मेसचा व्यवसाय वाढीस लागला आहे. नगर ‘मेस’चे केंद्रबिंदू ठरत असून यातून दरमहा लाखो रूपयांची उलाढाल होत आहे. अहमदनगर राज्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे येथे शासकीय आणि निमशासकीय संस्थांचे जाळे निर्माण झाले आहे. शहरात मेसचे सुमारे १२०ते १५० च्या आसपास व्यवसाय चालतात.

या व्यवसायांचा फायदा स्थानिक नागरिकांना रोजगार मिळण्यासाठी होत आहे. विशेष करून महिलांच्या हाताला काम मिळत आहे. एका मेसमध्ये आठ ते दहा महिला काम करतात. तसेच घरापासून दूर राहणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होत आहे. ग्रामिण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी नगर शहराला पसंती देतात. येथील शाळा-कॉलेज आणि स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसमुळे विद्यार्थी घरापासून दूर राहतात.

त्यामुळे त्यांना मेसच्या जेवणावरच अवलंबून राहावे लागते. मेस व्यवसायाचा नफा हा महागाईमध्ये होणान्या चढ-उतारावर ठरत असतो. सध्या एका विद्यार्थ्याकडून दरमहा सरासरी २१०० ते २५०० रूपये आकारले जातात. वाढत्या महागाईमुळे त्यात दरवर्षी १० ते २० टक्क्यांनी वाढ करावी लागत असल्याचे मेस चालक सांगतात.

महागाईचा चटका


सध्या शहरात घरगुती जेवणाला पसंती दिली जात आहे. त्यामुळे घरगुती मेसच्या व्यवसायात सध्या मोठी स्पर्धा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक ठिकाणचे दर आणि जेवणाची चव वेगळी आहे. या व्यवसायात घरगुती मेसचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान या व्यवसायाला आता महागाईचा चटका देखील बसत आहे.

सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कमीत कमी किंमतीत जेवण उपलब्ध करून देताना तारेवरची कसरत करावी लागते. महागाई कमी झाली तर विद्यार्थ्यांना अधिक स्वस्त जेवण देता येईल अशी प्रतिक्रिया काही मेसचालक देतात.

Ahmednagarlive24 Office