Ahmednagar News : नगरला टंचाईच्या झळा ! पाणी संपले चाराही संपला, जनावरे खपाटी गेली..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर पाणी टंचाई सोबतच चारा टंचाईचे सावट घोंगावत आहे. नगर तालुक्यात विशेषतः याची दाहकता जास्त जाणवत आहे. पशुपालकांकडील जनावराचा चारा संपत आला आहे. चारा छावण्या सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

एकीकडे नगर तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती भयानक असताना नेते मंडळी प्रचारात व्यस्त असल्याची स्थिती आहे. नगर तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चारा- पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

शासनाने टँकर हे माणसांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असली, तरी जनावरांसाठी पिण्याचे पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. नगर तालुक्यातील अनेक भागांत यंदा तीव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने या भागात लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नगर तालुक्यात काही गावे अशी आहेत की जेथे चारा एकदमच थोडासा शिल्लक राहिला आहे. शासनाने या भागाची पाहणी करून उपायोजना करणे गरजेचे आहे. चारा छावण्या, जनावरांना चारा, पाणी मिळावा, त्यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.

यंदा शेतकऱ्यांनी पेरणी केलेली संपूर्ण पिके पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला आहे . त्यात आतापर्यंत जनावरांसाठी इकडून तिकडून चारा आणून खाऊ घातला. पण आता या भागात भीषण पाणीटंचाई व चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांनीही हार मानली आहे.

घोसपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य पाईप लाईनची गळती दुरूस्तीचे काम आटोपत नाही तोच गुंडेगावचा पाणी पुरवठा करणारा टँकर खराब झाल्याने बाडी वस्तीवर चौथ्या दिवशीही पाणी पुरवठा होऊ शकला नाही. ऐन उन्हाळ्यात उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग चिनभिन झाला आहे.

सध्या शासनाने तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. चारा छावण्या असतील किंवा चारा पुरवठा असेल याच्या अनुशंघाने काही उपयाययोजना करायला हव्यात. पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता पाण्याचेही योग्य नियोजन व्हायला हवे.

यंदा पाऊस जरी समाधानकारक सांगितला असला तरी पाऊस पेडेपर्यंत कालावधी आहे. त्याकाळात पशुधन वाचवण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचेच असल्याचे मतशेतकरी व्यक्त करत आहेत.