अहमदनगर बातम्या

नगरकरांचा नादच खुळा ! ५ जणांनी अवघ्या ३४ तासांत पार केले ६०३ किमी अंतर.. नगर-पंढरपूर-अक्कलकोट- तुळजापूर- नगर..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : समाजामध्ये अशा काही व्यक्ती असतात की ज्या इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतात. अहमदनगरमध्ये अशा तरुणांची कमतरता नाही. अनेक क्षेत्रात तशी वेगळी कामगिरीही नगरकरांनी करून दाखवली आहे.

दरम्यान आता आणखी एक किमया नगरकरांनी केली आहे. पाच ध्येयवेड्या युवकांनी नगर-पंढरपूर-अक्कलकोट- तुळजापूर- नगर असा सुमारे ६०३ किलोमीटरचा प्रवास ३३ तास २७ मिनिटांत पूर्ण केलाय. सायकलिंग फेडरेशनने या सोलो सायकलवारीचे आयोजन केले होते.

शरद डोंगरे, डॉ. धनंजय राजगुडे, बापू कांडेकर, सत्यनारायण पुरोहित, डॉ. बाळासाहेब गायकर अशी ही पाच जण आहेत की ज्यांनी ही किमया केली. ही सायकलवारी १२ जुलै रोजी नगरहून सुरू झाली.

वाटेमध्ये ठिकठिकाणी त्या-त्या ठिकाणच्या गावकऱ्यांनी सायकलवारीचे स्वागत केले. पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेऊन् ते अक्कलकोटला गेले. अक्कलकोटहून तुळजापूर व तेथून नगरला आले. या ६०३ किमीच्या प्रवासासाठी त्यांना तीन दिवस लागले.

या सायकलवारी दरम्यान त्यांना २८८५ मीटरचा एलिवेशन (घाट रस्ता) लागला. ही सायकलवारी संस्मरणीय, अविस्मरणीय ठरली, अशी प्रतिक्रिया या सायकल वारकऱ्यांनी दिली.

विशेष म्हणजे या सायकलवारी दरम्यान, बॅकअप व्हॅन नव्हती, सायकल वारकऱ्यांनी आपापल्या बॅगा पाठीवर घेतलेल्या होत्या. ही अद्भुत ठरलेली सायकलवारी विठुरायाच्या चरणी अर्पण केली असल्याचे हे सायकलप्रेमी सांगतात.

२१० किमीचे अंतर अवघ्या चार दिवसांत…
पारनेर तालुक्यातील राळेगणसिध्दी येथील चौघांनी वारीचे २१० किमीचे अंतर अवघ्या चार दिवसांत पूर्ण केले होते. जयसिंग मापारी, सुनील मापारी, ज्ञानेश्वर मापारी, एकनाथ भालेकर, सुभाष गाजरे अशी वारकऱ्यांची नावे आहेत.

बुधवारी (दि. ३) सकाळी ८ वाजता हडपसर, पुणे येथून सुरू झालेली ही पायीवारी जेजुरी (पुणे), काळज (सातारा), मोरोची (सोलापूर), वेळापूर (सोलापूर) असा प्रवास करत पंढरपूरमध्ये रविवारी (दि. ७) दुपारी पांडुरंगाच्या दरबारात पोहोचली होती.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office