Ahmednagar News : अहमदनगर मधील धरणे खपाटीला ! सगळा मिळून अवघा २७ टक्के जलसाठा शिल्लक..’अशी’ आहे स्थिती..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. अहमदनगर जिल्ह्यामधील बहुतांश धरणांतील पाण्यानेही तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे उपलब्ध पाण्यातील सर्वाधिक पाणी बाष्पीभवनावर खर्च होत आहे.

मुळा धरणात ४६७५ दलघफु, भंडारदरा धरणात २९४५ दलघफु, तर निळवंडे धरणात २२३० दलघफु एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तारेवरची कसरत करत उपलब्ध पाण्यातून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले असून उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करण्याची निकड प्रकर्षाने पुढे येत आहे.

सध्या जिल्ह्यात सध्या अवघा २७ टक्केच जलसाठा राहिला आहे. एप्रिलअखेरसही अवस्था आहे. अजून मे महिना पूर्ण आहे. त्यामुळे पुढचा महिना पाण्यासाठी कठीण जाण्याची शक्यता आहे.  अहमदनगरमध्ये मुळा, भंडारदरा, निळवंड ही तीन मोठी, मुसळवाडी, टाकळीभान येथे मध्यम प्रकल्प, दक्षिण नगर जिल्ह्यात आढळा, घोड, मांडओहळ, घाटशीळ पारगाव, सीना, खैरी, विसापूर ही धरणे आहेत.

नगर शहरासह दोन नगरपालिका व जवळपास शंभरपेक्षा अधिक गावांची तहान भागवणाऱ्या मुळा धरणात सध्या ९२७५ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. यातील ४५०० दशलक्ष घनफूट मृतसाठा वगळता पुढील महिन्यांसाठी ४६७५ दशलक्ष घनफूट वापरता येणार आहे. या उपलब्ध पाण्यातून जुलै अखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

भंडारदरा धरणात सध्या ३२४५ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून त्यात उपयुक्त साठा २९४५ दशलक्ष घनफूट तर निळवंडे धरणात २४८६ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून त्यापैकी उपयुक्त साठा २२३० दशलक्ष घनफूट आहे. उपलब्ध पाण्यातील सर्वाधिक पाणी बाष्पीभवन इतर व्यय यावरच खर्च होणार आहे. सध्या धरणातून १० ते १२ दशलक्ष घनफूट पाणी बाष्पीभवन इतर व्यय यात दररोज खर्च होत आहे.

मोठ्या प्रकल्पावर जिल्ह्याची भिस्त आहे. मध्यम प्रकल्पांपैकी घाटशीळ पारगाव प्रकल्पात पाणीच शिल्लक नाही. आजच्या तारखेला १६ हजार २०१.६६ दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे. तसे पाहिले तर एकट्या मुळा धरणाचा जलसाठा २६ हजार दशलक्ष घनफूट आहे. त्या तुलनेत आजचा हा जलसाठा जिल्ह्याची चिंता वाढविणार आहे.

गेल्या वर्षी आजच्या तारखेला २९ हजार ७०९ दशलक्ष घनफूट एवढा जलसाठा होता. त्यामानाने यंदा १३५०७ दशलक्ष घनफूट पाणी कमी आहे. जिल्ह्यातील तीन मोठे प्रकल्प व सहा मध्यम प्रकल्पामध्ये ५१ हजार ९३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होतो. त्यात आता केवळ १६ हजार २०१ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहिले आहे.

सध्या जिल्ह्यात पाणीटंचाईची भीषणता तीव्र होत आहे. दररोज मोठ्या संख्येने टँकरची मागणी वाढत आहे. अनेक गावात विहीरी बोअर यासह पाण्याचे उद्भव कोरडे पाडल्याने आता या मोठ्या व मध्यम प्रकल्पांवर जिल्ह्याची भिस्त आहे

अहमदनगर जिल्ह्यातील पाणीसाठा
– धरणांतील पाणी साठवण क्षमता ५७ टीएमसी
– उपयुक्त एकूण पाणी साठवण क्षमता ५० टीएमसी
– सध्याचा एकूण उपलब्ध पाणीसाठा १६ टीएमसी
– सध्याचा उपयुक्त उपलब्ध पाणीसाठा ९ टीएमसी
– गतवर्षीचा आजचा उपलब्ध पाणीसाठा २९ टीएमसी