Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या गावात दि.१७ एप्रिल रोजी शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान हि घटना अकस्मात नसून हा घातपाताचा प्रकार आहे, असा आरोप हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थांनी केला आहे.
त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.तसे जिल्हा पोलीस प्रमुखांकडे निवेदन पाठविले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, (दि. १७) एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता शेततळ्यात बुडून रितेश सारंग पावसे व प्रणव सारंग पावसे या दोन सख्या भावांचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू अकस्मात नसून तो घातपाताचा प्रकार आहे.
याबाबत अनेकवेळा तालुका पोलीस स्टेशन व डीवायएसपी कार्यालयातील संबंधीत अधिकाऱ्यांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आम्ही करूनही आश्वासना पलीकडे संबंधित अधिकाऱ्याने कोणतीही कारवाई केलेली नाही.
त्यामुळे संबंधितावर कारवाई न झाल्याने हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थांनी बैठक घेतली. या बैठकीत घटनेचा निषेध करण्यात आला. या प्रकरणातील गुन्हेगारांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत कारवाई न झाल्यास हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थ पुणे-नाशिक हायवेवर टोल नाक्यावर रास्ता रोको करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान दोघे भाऊ हिवरगाव पावसा येथील शाळेत शिकत होते. यातील प्रणव हा तिसरीत तर रितेश हा पाचवीत होता. यांच्या वडिलांचे एक वर्षांपूर्वीच निधन झाले होते त्यामुळे आई शेती करून या दोघांचा सांभाळ करत होती.