Ahmednagar News : लाल परी म्हणजे ग्रामीण महागाची जीवनवाहिनीच, गाव खेड्यातील सर्वसामान्य नागरिकांना मुख्य प्रवाहात जोडण्याचे काम कोणी केले असेल तर ते एसटीने. मात्र सध्या याच एसटीच्या मुळावर अनेकजण उठले आहेत कि काय असा प्रश्न पडतो आहे.
कोणतेही आंदोलन झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका एसटीलाच बसतो.अनेकदा तर किरकोळ कारणावरून चालक व वाहकास मारहाण करण्याच्या देखील घटना घडल्या आहेत. नुकतीच एसटीत प्रवासा दरम्यान झोपलेल्या एका व्यक्तीस वाहकाने तुमचे उतरण्याचे ठिकाण मागे गेले आहे, तुम्ही उतरून घ्या. असे म्हटल्याचा राग आल्याने अज्ञात व्यक्तीने वाहक व चालकाला मारहाण करुन शस्त्राने वार करुन जखमी केल्याची घटना नेवासा ते नेवासा फाटा दरम्यान नाशिक-पाथर्डी बसमध्ये घडली .
याबाबत एसटी वाहक देवदत्त शरदराव अंदुरे ( रा. खरवंडी कासार, ता. पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, २८ मे रोजी नाशिक ते पाथर्डी ही बस पाथर्डीकडे घेवून येत असताना टिकीटाचे हिशोबापेक्षा एक इसम गाडीमध्ये अधिक असल्याचे मला समजल्याने मी सर्व प्रवाशांना विचारपूस करत असताना, एक इसम हा झोपलेला होता. त्यास उठवून तिकिट विचारले असता त्याचे तिकीट हे नेवासा पर्यंतचे होते.
त्यास आम्ही नेवासा पाठीमागे गेले आहे. तुम्ही उतरून दुसऱ्या गाडीने पुन्हा माघारी जा, असे सांगितले असता त्याने शिवीगाळ केली व बसच्या खाली न उतरता मला धक्काबुक्की करून दमदाटी करू लागला. त्यावेळी चालक पांडुरंग ज्ञानदेव काळे हेही पाठीमागे बसमध्ये आले. तेव्हा त्यांना देखील त्या अनोळखी इसमाने शिवीगाळ दमदाटी केली. तसेच त्यास आपण खाली उतरवत असताना त्याने त्याचे हातातील धारदार हत्याराने माझ्या कपाळाच्यावर जोरात फटका मारून मला जखमी केले. या बाबत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
तसे पाहता सध्या महागाईच्या काळात इतर वाहतुकीच्या साधनांच्या तुलनेत एसटीने नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर सवलतीच्या दरात योजना राबवल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी एसटी ही आपलीच आहे,असे मानून एसटीच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.