Ahmednagar News : दुचाकी आणण्यासाठी वडील मुलीच्या घरी गेले.. त्यावेळी त्यांना घर बंद दिसले… घरातून साउंडचा आवाज येत होता.. म्हणून त्यांनी दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश केला असता मुलगी रक्ताच्या थारोळ्यात दिसली..जावयाने चाकूने सपासप भोसकले होते..
ही घटना घडलीये अहमदनगर शहरातील सिद्धार्थनगर येथे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रेवती ऊर्फ राणी संदीप सोनवणे असे मयत पत्नीचे नाव आहे. संदीप ऊर्फ कुंदन राधाजी सोनवणे (रा. सिद्धार्थनगर, नगर) असे आरोपी पतीचे नाव आहे.
याबाबत रेवतीचे वडील बाळू केशव साठे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की रेवतीचा अठरा वर्षांपूर्वी संदीपशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. काही महिन्यांपासून संदीप चारित्र्याचा संशय घेऊन रेवतीला नेहमी मारहाण करीत होता. ७ जून रोजी रेवतीने, पतीने रात्री मारहाण करून पावसात घराबाहेर काढले, असा फोन केला.
त्यामुळे रेवती व दोन्ही मुलांना घेऊन बुऱ्हाणनगरला आलो. नंतर जावई चूक झाली, असे पुन्हा होणार नाही, असे म्हणून रेवतीला घेऊन गेला. मंगळवारी (दि. १८) रोजी दुपारी बारा वाजता मुलीला भेटण्यासाठी गेलो तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता. पहिल्या मजल्यावर रेवती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती.
नातेवाइकांना बोलावून तिला जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, तिचा मृत्यू झाला होता. आरोपी संदीप सोनवणे याने पत्नीचा चाकू व धारदार हत्याराने खून केला आणि तो पसार झाला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, तोफखाना पोलिस आता आरोपीचा शोध घेत आहेत.