Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाने मृग नक्षत्रतातच जोरदार हजेरी लावली. उत्तरेच्या तुलनेत यंदा दक्षिणेत चांगला पाऊस सुरवातीच्या टप्यात झालेला दिसतोय. दरम्यान हरिश्चंद्रगडाच्या पर्वत रांगांत मान्सून सक्रिय होऊ लागला आहे.
मुळा खोऱ्यातील आंबित येथील लघु पाटबंधारे तलाव शुक्रवारी सकाळी सात वाजता पूर्ण क्षमतेने भरला. मुळा नदीवरील असणारे आंबीत लघुपाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने जिल्ह्यातील यंदाच्या पावसाळ्यात भरलेले हे पहिले धरण असावे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
मागील चार दिवसांपासून हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचा जोर वाढत नसला तरी पडत असलेल्या पावसाच्या सरींमुळे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी मुळा नदीवर असलेले १९३ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आंबित धरण शुक्रवारी सकाळी सात वाजता भरून वाहू लागल्याची माहिती शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.
पावसात जोर नसल्याने या धरणाच्या भिंतीवरून थोड्या प्रमाणात पाणी नदीपात्रात झेपावू लागले आहे. दरवर्षी मान्सून सुरू झाला की, मुळा खोऱ्यातील आंबित लघु पाटबंधारे तलाव भरत असतो. याहीवर्षी हा तलाव भरल्यामुळे आता या परिसरातून मुळा नदी प्रवाही होणार हे निश्चित आहे.
पडत असलेल्या पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी टाकून ठेवलेल्या भातरोपांना संजीवनी मिळाली आणि बळिराजाही सुखावला आहे. नगर तालुक्यात मृग नक्षत्रात सर्व दूर पावसाने जोरदार हजेरी लावली. जेऊर पट्टयात ससेवाडी,
उदरमल, शेंडी, पोखर्डी येथे बुधवारी (दि. १२) ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सीना तसेच शेंडी पोखडर्डी येथील नद्यांना महापूर आला होता. पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी वाफसा होण्याची वाट पाहत आहेत. शुक्रवारी दुपारी जेऊर चापेवाडी, म्हस्के वस्ती, कोथिंबीरे मळा, माळखास परिसरात जोरदार पाऊस झाला.
पाणलोटात अद्याप पाऊस नाही
जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलेली असली तरी पाणलोटात अद्याप समाधानकारक पाऊस सुरु झालेला नाही. मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही मान्सून सक्रिय झालेला नाहीं. मुळा खोऱ्यात अधूनमधून रोहिणी नक्षत्रापासून पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र, अद्यापही या परिसराला साजेसा पाऊस सुरू झालेला नाही.