Ahmednagar News : उन्हाळी सुटी संपल्यानंतर शनिवार पासून सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्याने सर्वच शाळांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पहिल्या दिवशी शाळेत मुलांचे स्वागत करण्यात आले. मात्र, शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावात तीन शालेय विद्यार्थिनींचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मेंढवण येथील सृष्टी उत्तम डापसे (इयत्ता सहावी, वय १३), वैष्णवी अरुण जाधव (इयत्ता सहावी, वय १२) व अनुष्का सोमनाथ बढे (इयत्ता चौथी, वय १०), या तीन विद्यार्थिनी लोणी येथील कन्या शाळेत शिक्षण घेत होत्या.
सुटी संपल्यानंतर सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. शनिवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने त्या सकाळी गावातील खासगी वाहनाने शाळेतगेल्या होत्या. दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्या गावाकडे परतल्या. त्यातील एकीच्या घरी त्यांनी जेवण केले. दरम्यान, मेंढवण गावानजीकच्या सोमनाथ काशिनाथ बढे यांच्या शेतात नवीन शेततळे खोदलेले असून काही प्रमाणात काम झाले असून तेथे खोल खड्डा आहे.
पाऊस झाल्याने त्या खड्यात पावसाचे पाणी साचलेले आहे. घराकडे जाताना तिघी शेततळ्याकडे गेल्या. त्या शेततळे बघण्यासाठी तिकडे गेल्या असाव्यात आणि पाय घसरून एखादी मुलगी पाण्यात पडली व तिला वाचविताना इतर दोघीही पाण्यात बुडाल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
बराच वेळ होऊनही मुली घरी का पोहचल्या नाहीत, याची चौकशी कुटुंबियांनी केली असता, ही घटना समोर आली. त्यानंतर शेतकी संघाचे संचालक विनायक काळे, संपत काळे, ज्ञानेश्वर काळे, नवनाथ काळे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शेततळ्यातील पाण्यातून बाहेर काढले.
पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत तीन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविले.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरीक घटनास्थळी जमा झाले. या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
शाळेच्या पहिल्याच दिवशी तीन शालेय विद्यार्थिनींचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने मेढवण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. याबाबत तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत.