Ahmednagar News : करणाऱ्यांसाठी काहीही अश्यक्य नसते मग ते शेती असो की इतर काही. शेती व्यवसाय हा तसा बेभरवशाचा मानला जातो. अस्मानी, सुलतानी संकटे पाहता शेतीतून निघणाऱ्या उत्पनाचा भरवसा नसतो.
परंतु जर एखाद्या पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान, लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन आदी गोष्टी समजावून घेतल्या तर मात्र आपण त्यातून भरपूर नफा कमावू शकतो हेच जणू अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील नांदूर येथील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. नांदूरमध्ये आद्रकचे (Ginger farming) विक्रमी उत्पादन घेतले जाते.
नांदूरमध्ये होते आद्रकचे विक्रमी उत्पादन
आठ ते दहा वर्षापासून राहाता तालुक्यातील नांदूर है गाव आले शेतीचं गाव म्हणून पुढे येत आहे. मागील आठ ते दहा वर्षांपासून या भागात जवळपास अनेक शेतकरी आले शेती करत आहेत.
आले पिकातून चांगले उत्पादन मिळत असले तरी या पिकाचं उत्पादन तंत्रज्ञान समजून घेत या पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. उत्पादन तंत्रज्ञान योग्यवेळी व्यवस्थापन या गोष्टी शेती क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहे. जवळपास १०० एकरवर या गावात आल्याचे उत्पन्न घेतले जाते.
भदे परिवाराने घेतले विक्रमी ३० टन उत्पादन
भदे परिवाराने आले पिकांचे विक्रमी ३० टन उत्पादन घेतले आहे आणि यातून त्यांना चांगला फायदाही झाला आहे. अमोल बाळासाहेब भदे आणि त्यांचे बंधू बाबासाहेब भदे हे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आले पिकाची लागवड करतात.
उत्पादन तंत्रज्ञान योग्यवेळी व्यवस्थापन या गोष्टी शेती क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहे. हेच भदे कुटुंब करते त्यामुळे त्यांना विक्रमी असा नफा या माध्यमातून मिळत आहे आणि अनेक शेतकरी एकत्र आल्यामुळे आले शेतीवरच्या ज्या समस्या आहेत या समस्यांवर देखील त्यांना काही अंशी उपाययोजना एकत्रित शेतीच्या माध्यमातून करणे सहज शक्य होते.
शेतकरी म्हणतो की शेती परवडत नाही सरकार भाव देत नाही परंतु योग्य पद्धतीने नियोजन जर केले आणि कमी खर्चात जास्त उत्पादन जर घेतले तर शेती ही नक्कीच परवडू शकते. यासाठी गरज आहे ती उत्पादन खर्च कमी करून एकरी उत्पादन वाढवण्याची आणि हेच आम्ही करतो यामुळे आम्हाला आले बरोबरच इतर शेती देखील फायदेशीर ठरत असते. असे अमोल भदे सांगतात.
योग्य मार्गदर्शन, योग्य नियोजन
बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत नेहमीच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती दिली जाते. दरवर्षी १५ मार्चच्या दरम्यान बेण्याची निवड करून १५ मे च्या दरम्यान त्यांची लागवड प्रत्यक्ष शेतात केली जाते.
शेतीची दोन वेळा नांगरणी, एक वेळा कल्टीव्हेटर करून रोटावेटर मारून जमिनीची मशागत केली जाते. जमिनीच्या मशागतीच्या वेळेस एकरी चार ट्रॅक्टर कुजलेल्या शेणखताचा वापर केला जातो. त्यानंतर साडेचार फूट अंतरावर बेड पद्धतीने ठिबक सिंचनाचा वापर करून यावर लागवड करताना बीजप्रक्रिया करून लागवड केली जाते. लागवड करताना सेंद्रिय आणि रासायनिक खतांची योग्य मात्रा ही माती परीक्षणानुसार दिली जाते.
कीटकनाशकाचा वापर करत असताना सेंद्रिय, वनस्पतीजन्य आणि एकात्मिक कीड नियंत्रणाबरती नेहमीच भर दिला जातो. खत व्यवस्थापन करत असताना पिकाला काय गरज आहे त्यानुसार खतांचा वापर करत असताना जिवाणू खते,
विद्राव्य खते, त्याचबरोबर सेंद्रिय खते आणि गरजेनुसार रासायनिक खतांचा वापर केला जातो. पिकांचा कालावधी हा साडेआठ महिने असला तरी या पिकाच्या माध्यमातून उत्पादन देखील विक्रमी मिळत असते.