Ahmednagar News : महापालिकेचा ठेका घेतलेल्या कॉक्रीटीकरणाच्या कामासाठी एक हजार १०० सिमेंट गोण्यांचे तीन लाख २० हजार रूपये घेऊन गोण्या न देता ठेकदाराची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी सचिन अरूण देशपांडे (वय ४४ रा. विद्याविहार सोसायटी, बालिकाश्रम रस्ता) यांनी शनिवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपोवन रस्त्यावरील सी. एस. पी. एन्टरप्रायजेस दुकानाचा मालक हर्षवर्धन गावडे (पूर्ण नाव नाही) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. देशपांडे हे शासकीय ठेकेदार असून ते दत्तराम कैकाडी मजुर सहकारी संस्थेच्या नावाने कामे घेत असतात. त्यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये महानगरपालिकेकडून घेतलेल्या ठेक्याचे नालेगाव येथे कॉक्रीटीकरणाचे काम चालू होते. त्यासाठी त्यांना सिमेंट गोण्यांची आवश्यकता होती.
त्यांनी सी. एस. पी. एन्टरप्रायजेस दुकानाचा मालक हर्षवर्धन गावडे याच्याशी संपर्क केला. गावडे हा २० फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी देशपांडे यांच्या अभय सेल्स दुकानात आला व त्याने २९०.९१ रूपये दराने एक हजार १०० गोण्या देण्याचे सांगितल्याने देशपांडे यांनी त्याला दुसऱ्या दिवशी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी तीन लाख २० हजार रूपये आरटीजीएस द्वारे दिले.
दरम्यान गावडे याने देशपांडे यांना गोण्या दिल्या नाही म्हणून त्यांनी जोडीदार कैलास बापुराव शिंदे यांना सोबत घेऊन तपोवन रस्त्यावरील सी. एस. पी. एन्टरप्रायजेस या दुकानात चौकशी केली
असता त्याच्या वडिलांनी सांगितले की, ‘हर्षवर्धन हा येथे राहत नाही, तो पुणे व कधी नगरमध्ये राहतो. त्याने बऱ्याच लोकांना असे फसवलेले आहे. तुम्ही तुमचे पैसे विसरून जा’ असे सांगितल्याने देशपांडे यांनी पोलिसात फिर्याद देत शनिवारी (20 जुलै) रोजी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.