Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्हयाला वरदान ठरणाऱ्या अनेक धरणात पाणीसाठा वाढत चालला आहे. याठिकाणी आपण सर्वच धरणातील पाणीसाठा जाणून घेणार आहोत.
दारणा : दारणाच्या पाणलोटात रविवारी जोरदार पाऊस झाल्याने दारणात काल सकाळ पर्यंत २८६ दलघफू पाणी २४ तासांत दाखल झाले. गेल्या दोन महिनाभरापासुन पावसाने दडी मारलेली आहे.
सात टीएमसी क्षमतेचे दारणा ४ टीएमसीने भरले आहे, त्यात ५६ टक्के पाणीसाठा तयार झाला. त्यामुळे नगर- नाशिक जिल्हयातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या धरणात ५६ टक्के पाणीसाठा झालाय.
भावली / गंगापूर : ७५.७६ टक्क्यांवर तर गंगापूरचा साठा २४ तासांत ३३.६६ टक्क्यांवरून ३३.८५ टक्के इतका आहे. काल सकाळ पर्यंत दारणाच्या पाणलोटातील घोटीला मागील २४ तासांत ३९ मिमी, इगतपुरीला ६८ मिमी, दारणाला ११ मिमी पावसाची नोंद झाली.
या पावसाने दारणात २४ तासांत २८६ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. ७१४९ दलघफू क्षमतेच्या दारणात ४००८ दलघफू पाणीसाठा झाला आहे. म्हणजेच ४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मुकणे १७.३५ टक्के, वाकी १३.९६ टक्के, भाम ५६.७४ टक्के, भावली ७५.६६ टक्के असे साठे काल सकाळपर्यंत झाले.
कुकडी २० टक्के
दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कुकडी प्रकल्प धरणात वाढ होत आहे. या प्रकल्पात कालअखेर २० टक्के पाणीसाठा झाला आहे. जूनअखेर या प्रकल्पात केवळ ४ टक्के पाणीसाठा होता.
या समूह धरणात एकूण पाणीसाठा ५७८९ दलघफू झाला होता. या प्रकल्पातील सर्वाधिक क्षमता असलेल्या डिंभे धरणातील पाणीसाठा २८ टक्क्यांवर पोहचला आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा ३४८५ दलघफू झाला आहे. येडगाव ३३ तर वडज ३४ टक्के भरले आहे.
मुळा ३५ टक्के
नगर दक्षिणेची तृष्णा भागविणाऱ्या मुळा धरणाचा पाणीसाठा आठ हजार दलघफू बनला आहे. तळाला गेलेल्या पाणीसाठ्यात वाढ होत असून गत पंधरवड्यातच धरणात तीन हजार दलघफू नविन पाणी जमा झाले आहे.
त्यामुळे धरणसाठा ९६०० दलघफू इतका झाला असून धरणाकडे ५ हजार ९०० क्यूसेक प्रवाहाने नविन पाण्याची आवक सुरू आहे.
भंडारदरा ५० टक्के
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे भंडारदरा धरण ५० टक्के भरले असून धरणाचा पाणीसाठा ५ हजार ५०८ दशलक्ष घनफुट इतका झाला आहे.
धरण क्षेत्रामध्ये पावसाची बॅटिंग सुरुच असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणामध्ये नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.