अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : सैराट झालेल्या मुलीकडून बाप लेकीच्या नात्यालाच गालबोट; सासरचे लोकं आणून आई वडिलासह भावाला केली बेदम मारहाण

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पूर्वी आई वडील सांगतील ते काम करणे अशी एक पद्धत होती. यात मुलगा अथवा मुलगी यांचे विवाह देखील आई वडील ठरवतील त्याच मुलगा अथवा मुलगी सोबत केले जात असत.परंतु बदलत्या काळासोबत ही प्रथा मागे पडली असून आता मुली स्वतःच्या मर्जीने लग्न करत आहेत. त्यातल्या त्यात मुलापेक्षा मुलीचे आपल्या बापावर अधिक प्रेम असते असे म्हणतात.

मात्र अवघ्या दीड महिन्यापूर्वी घरातून पळून जावून प्रेम विवाह केलेल्या एका मुलीने सासरच्या काही मंडळीसह नातेवाईकांना आणून, घरात जमावासह घुसून उचकापाचक करीत आई, वडिलासह भावाला जबर मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी ११ जणांविरुद्ध घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वनकुटे गावात ४० वर्षीय शेतकरी कुटुंब शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदर निर्वाह करते. त्यांच्या मुलीने दीड महिन्यापूर्वी घरातून पळून जावून पिंपळदरी येथील एका तरुणाशी आई- वडिलांच्या इच्छेविरुद्ध प्रेम विवाह केला.

प्रेम विवाह केल्यानंतर सदरची मुलगी दीड महिन्यानंतर कागदपत्र नेण्यासाठी माहेरी आली. मात्र आईने कागदपत्र देण्यास नकार दिल्याने तिने आईला काठीने मारहाण केली. पिडीत आईने हा प्रकार पतीस सांगितला. पती तत्काळ घरी आले.

यावेळी मुलगी पुन्हा घरी आली. वडिलांनी रागाच्या भरात तिला चापट मारुन, सांगितले की, ‘तू पुन्हा येथे येऊ नको.’ यावेळी पिडित महिलेचा पती व मुलगा घराजवळ असताना मुलीच्या सासरकडील काही महिलांनी पिडीत महिलेचे केस पकडून खाली पाडून, शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

दरम्यान, पिडीत कुटुंब घरात गेले असता परत सासरकडील पुरूषांनी पिडीत महिलेच्या पतीस दरवाजातून बाहेर ओढून मारहाण केली. दरम्यान, या झडापटीत घरातून पिडितेच्या पतीचे पावणे दोन लाख रुपये गहाळ झाले.
याप्रकरणी ११ जणांविरुद्ध घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे आई- वडिलांच्या इच्छेविरुद्ध प्रेम विवाह केल्याचे दुःख वेगळेच परंतु स्वतःच्या मुलीनेच सासरचे लोकं आणून आई वडिलासह भावाला बेदम मारहाण केल्याने बाप लेकीच्या नात्यालाच गालबोट लागले आहे .

Ahmednagarlive24 Office