Ahmednagar News : राज्यात महायुतीला अतिशय चांगले यश मिळणार असून, जिल्ह्यातील महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र निझर्णेश्वर येथे मंत्री विखे पाटील यांनी महाअभिषेक करून दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना महायुतीच्या विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले, देशातील जनतेने विकासाला पाठबळ देतानाच राष्ट्रहिताचा विचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास व्यक्त करताना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतांच्या रूपाने पाठबळ दिले आहे. राज्यात जनतेच्या मनातील सरकार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या सर्वांनीच राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्याने महायुतीला लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. निकालाचे कल काहीही असले, तरी महायुती सर्वाधिक जागा जिंकेल, असा दावा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
नाशिक शिक्षक मतदारसंघातून राजेंद्र विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, की पदवीधर निवडणुकीतच त्यांनी उमेदवारी मागितली होती; पण त्यावेळेस पक्षीय स्तरावर काही वेगळे निर्णय झाले, त्याला साथ देण्याची भूमिका घेतली.
आताच्या निवडणुकीसाठी राजेंद्र विखे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उमेदवारी मागितली आहे. त्यांच्या उमेदवारीला माझा पाठिंबाच असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक शिवाजीराव जोंधळे, प्रवरा सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, संगमनेर विधानसभा प्रमुख अमोल खताळ, सरपंच श्रीनाथ थोरात यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.