अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : महसूल पथकास कार आडवी आली.. त्यातील टोळक्याने कर्मचाऱ्यांना गाडीतून खाली ओढत लाथाबुक्क्यांनी मारले.. वाळूतस्करांचा फिल्मीस्टाईल राडा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील वाळूतस्करी व वाळू तस्करांचे हल्ले या गोष्टी सातत्याने समोर येतात. आता अहमदनगर जिल्ह्यातून वाळूतस्करांचा फिल्मीस्टाईल राडा समोर आला आहे. महसूल कर्मचाऱ्यावर हल्ला करून वाळूने भरलेला ट्रॅक्टर पळवल्याचा प्रकार कोपरगाव तालुक्यात घडला आहे.

अधिक माहिती अशी : बेकायदेशीर वाळू तस्करी रोखण्यासाठी शनिवारी रात्री नायब तहसीलदार प्रफुल्लिता चंद्रभान सातपुते हे आपल्या पथकासह सुरेगाव शिवारात गस्त घालत होते. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यासमोर सुरेगाव ते कोळपेवाडी रोडवरून माहेगाव देशमुखच्या शिवारात असलेल्या मारुती मंदिराजवळून विना नंबरचा निळा रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर व दोन चाकी ट्रॉली ५ हजाराची वाळू महसूल पथकाने अडवली.

कारवाईसाठी तहसील कार्यालयात आणत असताना एका पांढऱ्या रंगाची स्विप्ट कारने महसूल विभागाची गाडी अडवली. कैलास देवराम कोळपे, आकाश मदने, सुनील मेहरखांब आदींसह पाच जणांनी ट्रॅक्टरवरील महसूल कर्मचारी संकेत पवार व योगेश सोनवणे यांना खाली ओढून लाथ्याबुक्याने मारहाण केली.

सदरचा ट्रॅक्टर पळवून नेला. या घटनेबाबत नायब तहसीलदार प्रफुल्लीता चंद्रभान सातपुते यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन कैलास देवराम कोळपे, आकाश मदने, सुनील मेहरखांब यासह तीन अनोळखी इसमविरुद्ध तक्रार नोंदविली. यातील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने वाळू सर्वसामान्य जनतेस सहज व माफक दरात उपलब्ध व्हावी, याकरिता कुंभारी शिवारात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून शासकीय वाळू डेपो उभारण्यात आले.

मात्र, या वाळू डेपोत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूची विल्हेवाट लावली जात आहे. यात महसूल यंत्रणा व स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते यांचे हात ओले करून बिनबोबाट कारनामे सुरू होत आहे. याबाबत तहसीलदार संदीप भोसले यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

Ahmednagarlive24 Office