Ahmednagar News : राहुरी नगरपरिषद मधील वर्ग ३ च्या रिक्त लिपीक पदावर कैलास विठ्ठल शिंदे यांचा वारस हक्क असताना या पदावर गैरप्रकार करून दुसऱ्याच व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आरोप करून शिंदे यांनी दि. ८ जूलै २०२४ रोजी सकाळपासून राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणाला भेट देत शिवसेना राहुरी तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राहुरी नगरपरिषदेत होत असलेल्या गैरप्रकाराबाबत तक्रार दाखल केली आहे. कैलास विठ्ठल शिंदे (रा. राहुरी) यांनी दि. ८ जुलै २०२४ रोजीपासून सहकुटुंब राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
शिंदे यांनी सांगितले, की त्यांचे वडील कै. विठ्ठल पाराजी शिंदे हे राहुरी नगरपरिषदेमध्ये लिपीक पदावर कार्यरत असताना दि. १३ सप्टेंबर २००५ रोजी ते दिवंगत झाले. तेव्हापासून म्हणजे गेल्या २० वर्षांपासून कैलास शिंदे अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीक्षेत आहेत. कै. विठ्ठल पाराजी शिंदे हे लिपीक या वर्ग ३च्या पदावर कार्यरत होते.
कैलास शिंदे यांच्याकडे वर्ग ३च्या पदासाठी आवश्यक असणारी सर्व पात्रता असून या लिपीक पदासाठी दावेदार प्रतिक्षा सुचीतील ते एकमेव उमेदवार आहेत. असे असताना राहुरी नगरपरिषदेच्या आस्थापना विभागाने कैलास शिंदे यांची दिशाभुल करून त्यांना डावलण्यात आले. उपोषणाबाबत राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना कैलास शिंदे
यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन उचित कार्यवाही करण्याचे पत्र लांबे यांनी दिले आहे. उपोषणस्थळी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव शिवसेना युवा नेते प्रशांत लोखंडे यांनी भेट घेत या प्रकरणातील गैरकारभाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.
शिंदे यांच्या उपोषणाला ८ दिवस पूर्ण होत आहेत; परंतु राहुरी नगरपरिषदेच्या प्रशासनाने दखल घेतलेली नाही. म्हणून नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसैनिक सोमवार दि. १५ रोजी उपोषणकर्ते शिंदे यांना पाठिंबा म्हणून धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना राहुरी तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे यांनी दिलाय.