अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : वाढत्या उन्हाचा कहर कुक्कुटपालनाच्या जिवावर ! मरतुकीचे प्रमाण वाढले, चिकनचे दर वाढले, पण गणित जुळेना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राज्यातील सर्वच भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्याचा परिणाम कुक्कुट उद्योगावर झाला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे कोंबड्या जगवायच्या कशा, असा प्रश्न कुक्कुटपालन व्यावसायिकांना पडला आहे.

अत्याधुनिक पोल्ट्री शेडमध्ये उष्णतेचा जास्त प्रभाव जाणवत नसला तरी खुल्या शेडमधील कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाणही वाढले व वजनात कमालीची घट जाणवत आहे. त्यामुळे बाजारात दर चांगला असूनही कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे.

नगर जिल्ह्यात जवळपास अडीच हजार शेतकरी कुक्कुटपालनाटा व्यवसाय करतात. खासगी कंपन्यांशी करारावर कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

साधारणपणे दर महिन्याला ४० ते ४५ लाख कोंबड्यांचे आणि एक कोटी किलोच्या जवळपास कुक्कुटमांस उत्पादित होते. नगर जिल्ह्यात नेवासे, नगर, राहुरी, पाथर्डी, संगमनेर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात ब्रॉयलर कुक्कुटपालन केले जाते.

याशिवाय गावराण कुक्कुटपालन करणारेही अधिक शेतकरी जिल्ह्यात आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे. उन्हाचा पारा वाढल्याने उष्माघाताने कोंबड्याच्या मरतुकीचे प्रमाण सध्या २० २५ टक्क्यांवर गेले आहे. काही शेडमध्ये एसी व अन्य सुविधा केलेल्या आढळून येतात तेथे मात्र उन्हाचा परिणाम कमी जाणवतो.

मात्र असे शेड असलेल्या शेतकऱ्यांची संख्या दहा ते पंधरा टक्के असून ८५ टक्के शेतकरी खुल्या शेडमध्ये कुक्कुटपालन करतात. तेथे उन्हाचा अधिक फटका आहे. साधारणपणे ४२ दिवसांत वाढ होणारे वजनासाठी सध्या ५० दिवस लागत आहेत.

त्यात खाद्य अधिक लागत असून जसे वजन वाढेल तसे मरतुकीचे प्रमाणही वाढत आहे. त्याचा सर्वाधिक फटका कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे.

पिल्ले, कोंबडी, अंडी उत्पादक धास्तावले
ब्रॉयलर पिल्ले तयार करणाऱ्या पोल्ट्रीची संख्या मोठी आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढीस लागल्याने पिले तयार करणाऱ्यांसह कोंबडी, अंडी उत्पादक धास्तावले आहेत

दर मिळूनही आर्थिक फटका !
उन्हाळ्यात चिकनला मागणी कमी असते. मात्र उन्हामुळे नुकसान होत असल्याने सध्या कुक्कुट उत्पादन घेणाऱ्या शेतक-यांची संख्या नेहमीच्या तुलमेत केवळ ४० टक्के आहे. त्यातही मरतुकीचे प्रमाण अधिक आहे.

त्यामुळे साधारणपणे शंभर रुपये किलोपर्यंत असलेला ठोक विक्रीचा चिकनचा सध्याचा दर १६० ते १८० रुपयांपर्यत तर किरकोळ बाजारात ३०० रुपये प्रती किलो दर मिळत आहे. ठोक व किरकोळ बाजारात बॉयलर चिकनला दर सध्या चांगला असल्याचे पाहायला मिळत असले तरी मरतुक, वजनात घट आणि वाढीला लागणार अधिकचा कालावधी यामुळे मोठा आर्थिक फटका बसताना दिसतोय.

Ahmednagarlive24 Office