Ahmednagar News : आभाळ फाटलं ! कांदा झाकायला गेले अन अंगावर वीज पडली, मायलेकराचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:
vij

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून मोठी दुर्घटना समोर आली आहे. शेतकरी कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अवकाळी पावसाने व झालेल्या विजेच्या लखलखाटाने घरातील कर्त्या माणसांचा जीव घेतला आहे.

कांदा झाकण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षीय आईचा व २४ वर्षीय मुलाचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला आहे. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील यवती येथे घडली आहे.

शेतात कांदा झाकण्यासाठी गेलेल्या मायलेकराच्या अंगावर वीज पडून दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. सोमवारी (दि.२२) सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली असून मीना बाजीराव आढाव (वय ४५) व नवनाथ बाजीराव आढाव (वय २४) अशी मृत झालेल्या मायलेकरांची नावे आहेत.

आढाव कुटुंबीयांची सर्वसाधारण परिस्थिती आहे. मीना व बाजीराव यांनी दुसऱ्यांच्या शेतावर मोलमजुरी करून मुलगा नवनाथ याला शिकविले होते.

त्याने बीएस्सी अॅग्रीची पदवी संपादन केली होती. आई मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शासनाने आढाव कुटुंबीयांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यासह श्रीगोंदा तालुक्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व वादळ सुरु आहे. अनेक भागात याचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी फळबागा, पिके उध्वस्त झाले आहेत.

शेतकऱ्यांवर अगदी अवकळा आली आहे. याचा पंचनामा करत मदत मिळावी अशी देखील मागणी सध्या शेतकऱ्यांमधून होत आहे.

मोठे नुकसान : वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत. तर काही ठिकाणी विजा पडून मोठ्या दुर्घटनाही अनेक ठिकाणी झाल्या आहेत. तर काही गावे विजेचे खांब कोसळलल्याने आठवडाभरापासून अंधारात आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe