Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींची छेडछाड करून विनयभंग करणाऱ्या आरोपी शिक्षकाला अहमदनगर येथील न्यायालयाने दोषी ठरवून ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मदन रंगनाथ दिवे, रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता असे दोषी ठरलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळेत आरोपी शिक्षक मदन दिवे याने पीडित मुलींची वर्गामध्ये छेडछाड करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले होते. या घटनेची माहिती पीडित मुलींनी शाळेच्या मुख्याध्यापिकेस लेखी दिली होती.
त्यानंतर राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी शिक्षका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला हा अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांच्यासमोर चालला. या खटल्यामध्ये एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. गुरुवारी आरोपी शिक्षक मदन रंगनाथ दिवे, रा. दाढ बुद्रूक, ता. राहाता यास जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. सहारे यांनी दोषी ठरवून
त्यास बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व १० हजार रुपए दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ अन्वये १ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेमुळे असले गलिच्छ प्रकार करणाऱ्याना चाप बसेल. शिक्षा विद्यार्थी नात्याला काळिमा फासणाऱ्या शिक्षकास शिक्षा झाल्याने नागरिकनातून समाधान व्यक्त होत आहे.