अहमदनगर बातम्या

अहमदनगरमध्ये पुन्हा अपहरणाचा थरार ! दोन मुलांना किडनॅप करण्याचा प्रयत्न, गावकऱ्यांचा पाठलाग, अन..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न शहरातील रामरिगबाबा टेकडी परिसरात रविवारी सायंकाळी फसला. यानंतर नागरीकांनी अपहरण करण्यासाठी आलेल्यांचा पाठलाग केला.

मात्र, अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले. शहरात या प्रकाराने भीतीचे वातावरण आहे. याबाबत पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना शहरवासीयांनी निवेदन दिले आहे.

शहरातील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सुहास उरणकर यांचा पुतण्या व त्याचा मित्र रस्त्याने जात होते. ओपन थिएटरच्या पुढे पाण्याच्या टाक्याच्या बाजूला वीज गेल्याने अंधार पडलेला होता.

तेथे दोघेजण मोटारसायकलवरून आले, त्यांनी उरणकर यांच्या पुतण्याला तुला चॉकलेट देतो, असे म्हणाले. मला काकांनी सांगितलंय कोणी काही दिले तर घेऊ नको. असे मुलाने सांगितले.

मात्र, त्यातील एकजण म्हणाला, याला उचल, तेव्हा मुलगा पळतच समोरच्या मित्राकडे धावला. त्याने ही घटना घरच्यांना सांगताच त्या दोन इसमांचा नागरिकांनी पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, दोघेजण मोटारसायकलवर तेथे आल्याचे दिसते आहे.

ते मुलांशी बोलताना दिसतात. मात्र, वीज नसल्याने त्यांचे चेहरे दिसत नाहीत. या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.

डॉ. सुहास उरणकर, निलेश गुरव, प्रसाद बादल, पंकज राठी, नारायण बोरुडे, सतीश लबडे, आदित्य टेके, ओम साखरे, नितीन उरणकर, प्रकाश बोरुडे, आकाश काळोखे यांनी पोलिस निरीक्षक मुटकुळे यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. याबाबत पोलिस तपास करतील. संशयितांबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांना द्यावी, असे मुटकुळे म्हणाले.

Ahmednagarlive24 Office