अहमदनगर बातम्या

निळवंडे उजव्या कालव्यावरील जलसेतूला पडले भगदाड, ‘या’ ग्रामस्थांना धोका

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : निळवंडेचे पाणी हा नेहमीच चर्चेचा विषय. दरम्यान त्यांच्या दोन्ही कालव्यातून शेतकऱ्यांच्या पिकांची तहान भागवली जाते. परंतु त्यामागील असणारी शुक्लकाष्ट मात्र संपण्याचे नाव घेत नाही.

आता निळवंडे उजव्या कालव्यावरील जलसेतूला भगदाड पडले असल्याचे वृत्त आले आहे. संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा परिसरात उजव्या कालव्यावर जलसेतू बांधण्यात आला आहे. कालव्याची भिंत असलेल्या ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे.

जलसेतूचे काम निकृष्ट झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या जलसेतूवरून जाताना खबरदारी घेण्याची गरज आहे. अपूर्ण काम पूर्ण न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाले.

त्यानंतर शेतीसाठी दोनदा आवर्तन सोडण्यात आले. मात्र, बांधलेल्या जलसेतूजवळील माती बांधकाम काही प्रमाणात बाकी आहे, त्यावर माती भरावा टाकणे गरजेचे आहे. या परिसरातील असलेल्या चार ते पाच जलसेतूवरील पाणी निचरा होत नाही तसेच पाणी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे जलसेतूवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते तसेच निमगाव पागा परिसरातील जलसेतूवर माती बांधकामाला भगदाड पडले आहे.

हे भगदाड पडले असल्याने कालव्याला पाणी असताना त्यावरून वाहने घेऊन जाणे धोकादायक ठरू शकते. रात्रीच्या वेळी अपघात घडल्यास मदत उपलब्ध होणे, ही कठीण बाब आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने जेथे भगदाड पडले आहे, त्याची योग्यरित्या दुरुस्ती केली जावी अशी मागणी होत आहे.

Ahmednagarlive24 Office